Pune : ऑगस्टमध्ये मेट्रो प्रवासी संख्या ७० लाखांच्या घरात

पुणे – तीन महिन्यांपासून मेट्रो प्रवासी वाढत असून ऑगस्टमध्ये ही संख्या ७० लाखांवर पोहचली आहे. मे मध्ये ४७ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला होता, जूनमध्ये हा आकडा ५२ लाखांवर तर जुलैमध्ये ५९ लाखांवर गेला. ऑगस्टमध्ये हा आकडा ६९ लाख ४८ हजार ५८८ पर्यंत गेला असून या आकडेवारीकडे पाहिल्यावर तीन महिन्यांत मेट्रोचे प्रवासी ४६ टक्क्यांनी वाढले आहेत.
गणेशोत्सवात मध्यवर्ती पेठांतील बहुतांश भाग वाहतुकीसाठी बंद असतो. यावेळी नागरिकांना आपली वाहने लांब लावून चालत मध्यवर्ती भागात यावे लागत होते. यावर्षी पहिल्यांदाच मध्यवर्ती भागातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रोचा टप्पा सुरू असल्याने लोक तेथे येण्यासाठी मेट्रोचा वापर करत आहेत.
मेट्रोचा वापर करणाऱ्यांची संख्या तीन महिन्यांपासून वाढत आहे. जूनमध्ये पहिल्यांदा मेट्रोच्या प्रवासी संख्येने ५० लाखांचा टप्पा पार केला. त्यामागचे कारण म्हणजे वारीदरम्यान पुण्यात आलेले वारकरी. जुलैमध्ये शैक्षणिक सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर मेट्रोचा वापर केल्याने हा आकडा वाढम्यास मदत झाली.
जुलै महिन्यात मेट्रोची प्रवासी संख्या १० लाखांनी वाढून ५९ लाखांवर गेली. विद्यार्थ्यांचे वाढलेले प्रमाण आणि गणेशोत्सवामुळे पुणे मेट्रोने सरासरी २ लाख प्रवासी संख्येचा टप्पा पार करत आघाडी घेतली. सध्याच्या गेल्यावर्षीच्या प्रवासी संख्येशी तुलना केली असता ही संख्या दुप्पट आहे.
पुणे मेट्रोवरील खर्च भरून निघण्यासाठी दिवसाला ६ लाखांहून अधिक प्रवाशांनी त्यातून प्रवास करणे आवश्यक आहे. तो आकडा अजून खूप लांब असला तरी त्या दिशेने पुणे मेट्रोची वाटचाल सुरू आहे.



