Pune Metro : मेट्रो सेवा तब्बल नऊ तास बंद; गैरसोय झाल्यामुळे प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया

Pune Metro : पुणे मेट्रोतर्फे धुलिवंदनाचे कारण देत मंगळवारी सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेट्रो सेवा बंद ठेवल्यामुळे अनेक पुणेकरांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक प्रवाशांनी या निर्णयाबद्दल मेट्रो प्रशासनावर टीका केली. सार्वजनिक वाहतूक सेवा सणांनिमित्त बंद राहात असेल, तर तिला सार्वजनिक सेवा म्हणणे योग्य ठरेला का, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला.
पुणे मेट्रोच्या संकेतस्थळावर उपलब्ध आकडेवारीनुसार साधारणपणे २ लाख पुणेकर दररोज मेट्रो सेवेचा वापर करतात. शनिवार किंवा रविवारसारख्या सुट्टीच्या दिवशीही या आकडेवारीत लक्षणीय घट होत नाही.
तसेच अनेक प्रशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये आणि इतर संस्थांना सणांंच्या दिवशी सुट्टी असतानाही मेट्रो सेवेचा वापर वाढला असल्याचे वारंवार निरीक्षणात आले आहे. असे असतानाही धूलिवंदनाच्या दिवशी मेट्रो सेवा सुमारे ९ तासांसाठी बंद होती.
मेट्रो ही पीएमपीएमएल, एसटी महामंडळ, रेल्वे व विमान वाहतूक सेवांप्रमाणे एक सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. या सेवा कोणत्याही सणाच्या दिवशी कोणतीही सुट्टी न घेता वर्षातील ३६५ दिवस आणि २४ तास सुरू राहात असताना मेट्रो सेवा बंद का केली जाते, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
‘मी दररोज पुणे रेल्वे स्थानक ते पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यालय असा प्रवास मेट्रोने करत असतो. आज मेट्रो सेवा बंद असल्याने मला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. मला ज्या वेळी प्रवास करायचा असतो, तेव्हा रेल्वेची कोणतीही लोकल नसते. त्यामुळे मला बसने प्रवास करावा लागला. यात माझे पैसे आणि वेळ वाया गेला; पण झालेला त्रास वेगळाच. रेल्वे किंवा पीएमटीप्रमाणे मेट्रोदेखील सुरू राहायला हवी.’ – मेघराज काकडे, मेट्रो प्रवासी





