Pune Metro – महामेट्रोचा वनाझ डेपो परिसर आता केवळ मेट्रोच्या गाड्या उभ्या करण्यापुरता मर्यादित राहणार नसून, पुढील काही वर्षांत तो कोथरूडमधील एक महत्त्वाचा व्यावसायिक केंद्रबिंदू बनण्याची शक्यता आहे. पुणे मेट्रोच्या हिल व्ह्यू पार्क कार डेपो परिसराच्या व्यावसायिक विकासासाठी महामेट्रोने खासगी विकासकांकडून निविदा मागवल्या असून, या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना थेट मेट्रो कनेक्टिव्हिटीसोबत इतर सोईसुविधांचाही लाभ घेता येणार आहे. वनाज-कोथरूड परिसरातील मेट्रो प्रवाशांची वाढती संख्या आणि डेपो परिसरातील मोकळ्या जागेचा वापर लक्षात घेऊन हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबवला जाणार आहे. या अंतर्गत कार्यालये, रिटेल दुकाने, व्यावसायिक आस्थापना तसेच इतर व्यावसायिक उपक्रम उभारले जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा विकास दोन भागांत होणार आहे. पहिल्या भागात सुमारे ८,७२६ चौ.मी. मोकळ्या जागेवर (ग्रीन फिल्ड) नवीन बांधकाम केले जाईल, तर दुसऱ्या भागात सुमारे १९,५०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या विद्यमान संरचना व्यावसायिक वापरासाठी विकसित होईल. या पार्किंगचाही समावेश असेल. ग्रीनफिल्ड भागाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांचा तर विद्यमान संरचनेच्या विकासासाठी १२ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. वनाझ मेट्रो डेपो. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विकास ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) संकल्पनेनुसार केला जाणार आहे. म्हणजेच मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेभोवती रोजगार, कार्यालये आणि व्यापारी सुविधा विकसित करून नागरिकांना खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत हा प्रकल्प ‘डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर’ (डीबीएफओटी) प्रारूपावर ६० वर्षांच्या कालावधीसाठी विकसित केला जाणार आहे. निवड झालेला खासगी विकासक प्रकल्पाचे डिझाइन, वित्तपुरवठा, बांधकाम आणि देखभाल करणार असून, कालावधी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण मालमत्ता पुन्हा महामेट्रोकडे हस्तांतरित केली जाईल. मेट्रो प्रशासनाच्या मते, या प्रकल्पातून महामेट्रोला तिकीट महसुलाव्यतिरिक्त दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होणार आहे. भविष्यात मेट्रो सेवा अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा प्रकल्पांना महत्त्व दिले जात आहे.