पुणे- छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रो गर्डरचे काम महामेट्रोने शुक्रवारी मध्यरात्री पोलीस फौजफाट्यात सुरू केले. हे काम सुरू होत असल्याची माहिती मिळताच गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी तेथे गर्दी केली. मात्र, पोलिसांनी या कामाच्या ठिकाणी येणारा रस्ताच बंद केल्याने काही वेळ थांबून हे मंडळाचे कार्यकर्ते विरोध न करता निघून गेले. मेट्रो पुलासाठी सुमारे 48 फूट लांबीचे दोन लोखंडी गर्डर शुक्रवारी सकाळी 6 पर्यंत बसवण्यात आले. उर्वरित दोन गर्डर पुढील आठवड्यात बसविले जाणार आहेत. हे गर्डर नदीपात्रातील खालील बाजूस तयार करण्यात येत आहेत. या कामामुळे मेट्रोच्या कामाला वेग येणार आहे. या पुलामुळे गणेशोत्सव मिरवणुकीला अडथळा येणार असल्याचे सांगत काही गणेश मंडळांनी त्यास विरोध केला आणि पर्याय मार्ग काढावा, अशी मागणी केली. त्यानंतर महापौरांनी हे काम थांबवण्यास सांगितले होते. त्यानंतर तीन महिन्यांपासून त्यावर चर्चा सुरू होती. मात्र, त्यासाठी सुचविलेले पर्याय खर्चिक असल्याने तसेच हे काम रखडल्याने दिवसाला सहा लाखांनी खर्च वाढत असल्याचे मेट्रोने कळविले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस बंदोबस्तात हे काम करण्याचे आदेश दिले होते. या गर्डरची उंची छत्रपती संभाजी महाराज पुलाच्या रस्त्यापासून 21 फूट उंच असणार आहे.