Pune Metro – महामेट्रोकडून मेट्रो मार्गाच्या परिसरात आवश्यक जनजागृती न केल्यामुळे तसेच भविष्यातील बांधकामांबाबत संभाव्य अडचणींकडे दुर्लक्ष झाल्याने गंभीर प्रकार समोर आला आहे. शुक्रवार पेठेत बांधकामासाठी बोअरवेल घेताना थेट मेट्रोच्या भुयारी मार्गालाच तडे गेल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंवरील बांधकामे, जागा आणि मालकांची सविस्तर माहिती महामेट्रोकडे उपलब्ध होती. तरीही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर या भागात मार्गाबाबत कोणतीही जनजागृती करण्यात आली नाही. भविष्यातील बांधकामे अधिकृतच असतील, असे गृहीत धरत महामेट्रोकडून महापालिका आणि राज्य भूजल प्राधिकरणाला केवळ पत्रव्यवहार करण्यात आला. महापालिकेने त्या पत्रानुसार कार्यपद्धती निश्चित केली असली, तरी बांधकामस्थळी बोअरवेल घेण्याबाबत राज्य भूजल प्राधिकरणाने या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. महामेट्रोकडून मेट्रो मार्गांच्या बांधकामादरम्यान उन्नत (एलिव्हेटेड) तसेच भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी ५० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम, बोअरवेल किंवा खोदकाम करताना मेट्रोची एनओसी घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच, बोअरवेलसाठी राज्य भूजल प्राधिकरणाने परवानगी देताना मेट्रोची एनओसी आवश्यक असल्याचेही नमूद केले होते. महामेट्रो त्यानुसार महापालिकेकडून बांधकाम परवानगी देताना मेट्रोची एनओसी बंधनकारक करण्यात आली असून, प्रस्ताव महामेट्रोकडे पाठविले जातात. मात्र, २०१७ मध्ये पत्र दिल्यानंतर राज्य भूजल प्राधिकरणाकडे मेट्रोच्या एनओसीसाठी एकाही प्रस्तावाची नोंद झालेली नाही. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. परिणामी, शुक्रवार पेठेत बोअरवेल खोदकाम करताना थेट भुयारी मेट्रो मार्गाला धक्का बसला असून, सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनधिकृत बोअरवेलकडे दुर्लक्ष मेट्रो मार्गाच्या सुरक्षेसाठी महामेट्रो, महापालिका आणि राज्य भूजल प्राधिकरण यांच्यात समन्वय आवश्यक असताना तो अभावानेच दिसून येतो. शिवाजीनगर ते स्वारगेट हा पूर्णपणे भुयारी मार्ग असल्याने कामादरम्यान आसपासच्या ५०० मीटर परिसरातील इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. बांधकामादरम्यान इमारतींना तडे जात आहेत का, याची नियमित तपासणीही करण्यात येत होती. त्यामुळे प्रत्येक जागेची माहिती महामेट्रोकडे होती. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर नवीन बांधकामे आणि बोअरवेलसाठी संबंधितांकडून आवश्यक परवानग्या घेतल्या जातील, असा समज ठेवण्यात आला. प्रत्यक्षात या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बोअरवेल घेतल्या जात असून, त्याकडे ना महापालिका लक्ष देत आहे, ना राज्य भूजल प्राधिकरण. परिणामी शहरात अनधिकृत बोअरवेलचे पेव फुटले आहे.