पुणे –महापालिकेचे मेडिकल कॉलेज सुरू होण्यापूर्वीच त्यावर एजंटांची वक्रदृष्टी फिरली आहे. या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एजंटांनी फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर नाशिकमधील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, असे सांगून 13 जणांची अडीच कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी येरवडा पोलिसांनी चंद्रशेखर देशमुख, राजेंद्र कुशवाहह, पारस शर्मा, व त्यांचे साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नगरमधील 47 वर्षांच्या नागरिकाने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पुणे महापालिकेच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी वार्षिक 7 लाख रुपये फी आहे. हे कॉलेज येत्या जूनपासून सुरू होणार आहे.
तेथील 78 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. आणखी 20 जागा भरण्यात येणार आहे. चंद्रशेखर देशमुख याने विमाननगर येथे शिक्षा सेवा इंडिया याने संस्था सुरू केली. फिर्यादी यांचा मुलगा जयदीप याला डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी व्यवस्थापक कोट्यातून प्रवेश घेऊन देतो, असे सांगून त्याच्या नावाचे बनावट ऍलॉटमेंट लेटर व सिलेक्शन लेटर तयार केले. फिर्यादी यांना दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. प्रवेशासाठी चेक व रोख 30 लाख 72 हजार रुपये घेतले. मात्र, मुलाला प्रवेश मिळवून दिला नाही. अशा प्रकारे त्यांनी सांगोला, पंढरपूर, पुणे जळगाव अशा विविध ठिकाणच्या आणखी 12 जणांना प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली 2 कोटी 53 लाख 17 हजार 559 रुपयांची फसवणूक केली आहे.
चंद्रशेखर हा शिक्षा सेवा इंडियाचा कोणाला व्यवस्थापकीय संचालक सांगायचा, तर काही जणांना राजेंद्र कुशावह हा आपण संचालक असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करुन फसवणूक करत होते. या भामट्यांनी काही जणांकडून 35 लाख, 16 लाख, 20 लाख, 25 लाख अशी वेगवेगळी रक्कमघेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे तपास करत आहेत.