Pune : पाणंद, शेत रस्त्यांसाठी मोजणी फी माफ

पुणे : गावातील पाणंद, शेतरस्ते खुले करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, अतिक्रमित झालेले रस्ते, तसेच रस्त्याची हद्द कुठे आहे, हे समजण्यासाठी या रस्त्यांची मोजणी करावी लागते. या मोजणीसाठी शेतकऱ्यांना भूमिअभिलेख विभागाकडे मोजणी फी भरावी लागत होती.
त्यामुळे मोजणी फी अभावी हे रस्ते खुले होण्यास अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पाणंद, शेतरस्त्यांच्या मोजणीसाठी फी न आकारण्याचा निर्णय घेतला असून, तसे पत्र भूमिअभिलेख विभागाला दिले आहे. त्यामुळे आता शेतरस्त्यांसाठी मोजणीचे शुल्क शेतकऱ्यांना भरावे लागणार नाही. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून रस्ते खुले करण्याच्या कामास गती येणार आहे.
कुटुंबाचे विभाजन होत असल्याने शेतीचेदेखील विभाजन होत आहे. त्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी-कमी होत असल्यामुळे शेतकरी यांचा कल त्यांच्या शेतातून सुरू असलेली वहिवाट बंद करण्याकडे आहे. त्यामुळे सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्र्माणात वहिवाट रस्ते, ग्रामीण रस्ते, हद्दीचे रस्ते खुले करण्याची अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. रस्ते खुले करण्यासाठी काही प्रकरणांमध्ये मोजणी फी कोणी भरायची यावरुनसुद्धा प्रकरणे प्रलंबित राहून रस्त्यांचा प्रश्न काही सुटत नसल्याचे समोर आले आहे.
यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एक परिपत्रक काढून तहसीलदार यांनी मोजणी करून रस्ते खुले करण्याकरिता गाव निहाय नियोजन करावी. त्याबाबतची कल्पना भूमिअभिलेख व पोलिस निरीक्षक यांना देण्यात यावी. रस्त्यांची मोजणी ही महिन्याच्या प्रत्येक बुधवारी करण्यात यावी. या मोजणीसाठी फी न आकारता मोजणी करण्यात यावी, असे या परिपत्रकात नमूद केले आहे. तसेच, यासाठी पोलीस बंदोबस्तासाठीसुद्धा शुल्क आकारू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
पायमार्ग गावच्या नकाशात तुटक रेषेने दर्शविलेले असून, या पायमार्गाची रुंदी सव्वा आठ फूट इतकी निश्चित आहे. तर गाडी मार्गाची रुंदी 16.5 ते 21 फुटांपर्यंत निश्चित केलेली आहे. त्यानुसार असे अतिक्रमित रस्ते मोकळे करण्यात येणार आहे.





