Pune Mayor Election – शहराचे नवे महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ६ फेब्रुवारी रोजी होणारी ही निवडणूक आता सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. या दिवशी महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पहिली विशेष सभा होणार असून, सकाळी ११ वाजता ही बैठक होईल. राज्याचे अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात २८ ते ३० जानेवारी या कालावधीत असलेल्या दुखवट्यामुळे या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित नव्हता.त्यानंतर अखेर विभागीय आयुक्त कार्यालयाने गुरुवारी दुपारी या सभेसाठीची तारीख महापालिकेस नव्याने कळविली आहे. ही विशेष सभा पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीतील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार या सभेच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम १९(१) नुसार या सभेत महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. तसेच, महाराष्ट्र महानगरपालिका (महापौर पदाचे आरक्षण) नियम २००६ नुसार पुणे महापालिकेचे महापौर पद महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. ३ फेब्रुवारीलाच महापौर निश्चिती महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नगरसचिव कार्यालयात दाखल करण्याची मुदत असणार आहे. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक ११९ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजप त्यामुळे, महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता असणार आहे. अशा स्थितीत भाजपकडून अर्ज भरण्यात आलेला उमेदवारच महापौर असणार आहे. मात्र, त्याच वेळी विरोधकांकडून भाजपला पाठिंबा दिला जाणार की निवडणुकीसाठी उमेदवार दिला जाणार याकडेही शहराचे लक्ष असणार आहे. आधी महापौर पदाचे आरक्षण आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दुखवटा असल्याने महापौर निवडीस उशीर झालेला आहे. त्यामुळे, इतर समिती सदस्यांच्या निवडीस उशीर झाल्यास नवीन स्थायी समितीला अंदाजपत्रक मांडण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महापौर निवडीच्या दिवशीच्या खास सभेतच स्थायी समितीवर एकूण १६ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच, कलम ३० (१) नुसार सहा विशेष समित्यांवर प्रत्येकी १३ सदस्य नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपकडून स्थायी समितीत देण्यात आलेल्या नावांवरून समिती अध्यक्ष कोण असणार हे चित्रही स्पष्ट होणार आहे. तर याच सभेत महापालिकेच्या सहा विशेष समित्यांच्या सदस्यांचीही निवड केली जाणार आहे. मात्र, त्याच वेळी महिला व बाल कल्याण समितीवर १३ सदस्य असणार असून त्यापैकी ७५ टक्के सदस्य महिला असणे बंधनकारक आहे. त्यामुळे नोंदणीकृत पक्ष व गटांच्या सभागृहातील तौलनिक संख्याबळाचा विचार करून, सभागृहनेता व विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करून समित्यांवरील सदस्यांचे नामनिर्देशन केले जाईल, असे नगरसचिव विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.