Pune Market Yard – बाजार समितीच्या मार्केट यार्डात रोज नवनवीन घोटाळे समोर येत आहेत. शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची पार्किंग शुल्काच्या नावाखाली मोठी लूट सुरू असल्याचे समोर आले आहे. वाहन पार्किंगसाठी एकदा पैसे मोजलेले असतानाही, पुन्हा दुसरी पावती फाडून शेतकऱ्यांकडून दुबार वसुली होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शेतकऱ्यांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कर्मचारी असताना सुरक्षा विभाग, अतिक्रमण विभाग याकडे लक्ष का देत नाहीत? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. मार्केटयार्डच्या प्रवेशद्वारावर किंवा विहित पार्किंगच्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वाहनाकडून शुल्क आकारले जाते. मात्र, काही वेळातच त्याच कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडून दुसरी पावती फाडण्यासाठी दबाव टाकला जातो. आधीची पावती ग्राह्य धरली जाणार नाही असे सांगण्यात येते. दुसरीकडे बाजार समितीच्या नावाने पावती असून, त्यावरचा जीएसटी नंबर चुकीचा आहे. काही पावत्यांवर जीएसटी नंबर नाही. अशा ५० पेक्षा जास्त पावत्या असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश ढोणे यांनी केला आहे. “फळ आणि भुसारी या दोन्ही विभागांकडून शेतकरी, टेम्पो चालकांची लूटमार सुरू आहे. तसेच दुबार पावतीवरील जीएसटी नंबर मॅच होत नसल्याने ही पावती खोटी असल्याचे आढळते. यामुळे जीएसटी अधिकाऱ्यांनीही यावर कारवाई करणे गरजेचे आहे. आता कारवाई केली नाही तर आंदोलन छेडू.” – गणेश ढोणे, जिल्हा उपाध्यक्ष, अखिल भारतीय किसान काँग्रेस “बाजार समिती पावती क्रमांकार जरी जीएसटी नंबर चुकला असला, तरीही बाजार समिती संपूर्ण जीएसटी भरत आहे. ज्यांना जीएसटी रक्कम परत मिळवायची आहे, त्यांना बरोबर जीएसटीचा नंबर दिला जाईल.” – डॉ. राजाराम धोंडकर,सचिव, पुणे बाजार समिती