रखडलेल्या प्रक्रियेला गती मिळण्याची चिन्हे पुणे- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सचिव पदाचा गेल्या अनेक दिवसांपासूनचा पेच अखेर सुटला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने महेंद्र हरपाळकर यांची आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती केली असून, त्यांच्यावर दोन वर्षांसाठी ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तत्कालीन सचिव डॉ. सुवर्णा खरात यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे महत्त्वपूर्ण पद रिक्त होते, ज्याचा मोठा फटका आयोगाच्या कामकाजाला बसला होता. काही दिवसांपूर्वी या पदावर अवर जिल्हाधिकारी जगन्नाथ वीरकर यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला होता. ‘एमपीएससी’च्या सचिव पदाचा ‘काटेरी मुकुट’ घालण्यास सनदी अधिकारी उत्सुक नसल्याने आयोगाचा डोलारा रिक्त पदांमुळे कोलमडला होता. या ढिसाळ नियोजनामुळे मागील ५-६ महिन्यांपासून विविध परीक्षांचे निकाल रखडले असून, मुलाखतींचे वेळापत्रकही जाहीर झालेले नाही. परिणामी, स्पर्धा परीक्षार्थींमध्ये प्रचंड संताप आणि नैराश्याचे वातावरण होते. ‘एमपीएससी’ ही घटनात्मक संस्था असून, सचिव हे तिचे कार्यालयीन प्रमुख असतात. परीक्षांचे आयोजन, निकाल, शिफारसी, न्यायालयीन प्रकरणे आणि नवीन नियमावली लागू करण्याची सर्व जबाबदारी सचिवांकडे असते. हरपाळकर यांच्या नियुक्तीमुळे आता रखडलेल्या जाहिराती, परीक्षा आणि नियुक्त्यांच्या प्रक्रियेला वेग येईल, अशी आशा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.