Pune : आगामी महापालिका निवडणुका महायुती एकत्रित लढवणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्ट निर्देश

पुणे : आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रिपणे लढविणार आहे. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच पुण्यात ठामपणे सांगितले होते. या विधानास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थन दिले असून, त्यांनीसुद्धा महायुती स्वबळावरच महापालिका निवडणुका लढविणार असल्याचे सांगितले.
विधानभवन येथे उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध कार्यकर्त्यांना लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनीसुद्धा महापालिकेच्या निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे सांगितले होते.
तसेच शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. जिथे तुल्यबळ स्पर्धक असतील तिथे अपवादात्मक परिस्थितीत वेगळे लढावे लागले तरी एकमेकांवर टीका न करता आम्ही चांगली स्पर्धा करू. कार्यकर्ते अनेक वर्ष प्रभागात काम करतात, त्यांना संधी द्यायला हवी. निवडणूकपूर्व वेगळी लढत झाली तरी निवडणुकीनंतर निश्चितच युती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त होता.
यावर शनिवारी उपमुख्यमंत्री पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, महायुती राज्यात स्वबळावर निवडणूक लढवेल. त्यास माझे समर्थन असेल.
दीपक मानकर यांचा राजीनामा योग्यच
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर नुकतेच गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर उपमुख्यमंत्री पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, अशा प्रकरणात राजीनामा देणे योग्य असते. कारण, पदावर असल्यास जास्त दडपण येते. त्यामुळे आता येथून पुढे पोलिसांना आपल्या पद्धतीने कारवाई करता येईल. मानकर यांच्यावरदेखील कोणतेही दडपण अथवा दबाव असणार नाही, असे देखील पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच मानकर यांनीसुद्धा माझी भेट घेत कारण नसताना मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.
पुणे शहराध्यक्षपदी कोणाची नियुक्ती जाहीर करणार असे विचारले असता पवार म्हणाले की, यासंदर्भात पक्षातील विविध नेत्यांशी चर्चा झाली आहे. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करू.





