मांजरी – “लोकसभेत फटका बसल्यानेच शिंदे-फडणवीस-पवार त्रिकुटाने राज्याच्या तिजोरीचीे दारे बाजूला ठेवून घोषणांचा पाऊस सुरु केला. सगळेच लाडके असल्याचे सांगत प्रसिद्धीसाठी वारेमाप पैशांची उधळपट्टी केली. राज्यावर लाखो कोटींचे कर्ज केले आहे. मात्र, हे लोक २० नोव्हेंबरपर्यंतच लाडक्या बहिणी म्हणणार आहेत. त्यानंतर त्या लाडक्या राहणार नाहीत. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
मतदारसंघात आमदारांनी लावलेल्या दिव्यांमुळे तुमच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिलेला आहे. या समस्या सोडवण्याची जबाबदारी महापौर म्हणून प्रभावी काम केलेल्या प्रशांत जगताप यांनी घेतली असून, त्यांना हडपसरच्या प्रतिनिधित्वाची संधी द्यायची आहे,” असे आवाहनही पाटील यांनी केले. हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारार्थ झेड कॉर्नर मांजरी येथे आयोजित जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते.
यावेळी महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवती अध्यक्षा सक्षणा सलगर, माजी उपमहापौर निलेश मगर,बंडुतात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, पूजा कोद्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख समीर तुपे, राष्ट्रवादी’चे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रवीण तुपे, कॉग्रेसचे अध्यक्ष दिलीप तुपे, विजय देशमुख, यशवंतराव गोसावी,गजेंद्र मोरे, शैलेंद्र बेल्हेकर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांच्या मांडीवर जाऊन आमदार बसलेत. म्हणून निष्ठेने काम करणाऱ्या प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तुमच्या आशीर्वादाने त्यांना विधिमंडळात पाठवायचे आहे. या मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्याचा आराखडा आणि इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे.
प्रशांत जगताप आघाडीवर आहेत. पुढचा आमदार तेच होणार आहेत आणि हडपसरचा विकास फुले, शाहू आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जात संविधानाचे महत्व अबाधित ठेवण्याचे काम प्रशांत जगताप करणार आहेत. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवा,” असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
प्रशांत जगताप म्हणाले, “गेल्या पाच वर्षात हडपसरच्या नागरिकांना काय मिळाले, याचा विचार करा. चार वर्षे सत्तेत राहूनही आमदारांना प्रश्न सोडवता आलेले नाहीत. मुंढवा-केशवनगर, मांजरी या ठिकाणी वाहतूक कोंडी, पाणीटंचाईची मोठी समस्या आहे. गुन्हेगारी, ड्रग्जमाफी, कोयता गॅंगमुळे हडपसरचे नाव बदनाम झाले आहे.
ही स्थिती बदलण्यासाठी अकार्यक्षम आमदारांना घरी बसवायचे आहे. या संघर्षाच्या काळात आम्ही पवार साहेबांची साथ सोडलेली नाही. याच निष्ठेचे आणि माझ्या कामाचे फळ मला मिळालेली उमेदवारी आहे. इलियास इसाक बागवान, आकाश गायकवाड, संजय येरळे, सुजल जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.