पुणे : मेट्रो ट्रॅकवर उतरून तसेच मेट्रो मध्ये पेट्रोलसारखा ज्वलनशील पदार्थ नेऊन आंदोलकांनी मेट्रो रेल्वे अॉपरेशन्स अॅक्टचे उल्लंघन केले आहे. मेट्रोने याबाबत पोलीसांना तक्रार दिली आहे. हा गुन्हा असून, अनेक प्रवाशांचे जीव यामुळे धोक्यात आणण्याचा हा प्रकार असल्याचे महामेट्रोचे अधिकारी हेमंत सोनवणे यांनी सांगितले. रविवारी दुपारी पाऊण वाजताच्या सुमारास पुणे मेट्रोच्या पुणे महापालिका मेट्रो स्थानकाच्या रुळांवरती एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. हे आंदोलनकर्ते दोन-चार लोकांच्या गटांनी मेट्रो स्थानकात प्रवासी म्हणून आले आणि त्यांनी अचानक मेट्रो रुळांवर उड्या मारल्या. मेट्रोच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत मेट्रो सेवा तत्काळ थांबवली. हे कार्यकर्ते पुणे मेट्रोच्या रूळांवर आणि बाजूच्या कठड्यांवर बसून आंदोलन करत होते, अशी माहिती सोनवणे यांनी दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून महा मेट्रोचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पोलीस आणि अग्निशामक दलाला ही माहिती देऊन बोलवण्यात आले. या सर्व आंदोलनकर्त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे, असे सोनवणे म्हणाले. या आंदोलनादरम्यान पुणे मेट्रोची मार्गिका – १ वरील सेवा पिंपरी-चिंचवड स्थानक ते स्वारगेट स्थानक या दरम्यान सुरळीत सुरू होती. तर मार्गिका – २ वरील सेवा रामवाडी ते जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक आणि वनाझ स्थानक ते छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक यादरम्यान सुरू होती. दुपारी पाऊण ते पावणे तीन या वेळेमध्ये महापालिका मेट्रो स्थानकातील सेवा बंद ठेवण्यात आली होती. दुपारी पावणे तीन नंतर पुणे मेट्रोची सेवा आता पूर्ववत सुरू झाली आहे. सेवा बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांना झालेल्या असुविधेबद्दल पुणे मेट्रो दिलगिरी व्यक्त केली आहे.