Pune : महावितरणची लकी ग्राहक योजना

पुणे : सलग तीन किंवा किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. यात प्रत्येक उपविभाग स्तरावर ५ बक्षिसे देण्यात येणार असून, एकूण तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे प्रादेशिक विभागातील १५९ उपविभागांसाठी एकूण २ हजार ३८५ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या योजनेमध्ये प्रत्येक उपविभागासाठी स्मार्ट फोन आणि दोन स्मार्ट घड्याळ अशी प्रत्येकी पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यासोबतच प्रत्येक बक्षिसासाठी दोन विजेत्यांची प्रतीक्षा यादी राहील. संपर्क करूनही विजेत्यांनी १० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास किंवा थकबाकी व इतर कारणांमुळे अपात्र असल्यास प्रतीक्षा यादीतील ग्राहकांना बक्षिसे देण्यात येतील. ही योजना महावितरणच्या विद्यमान कर्मचाऱ्यांसाठी नाही.
ग्राहकांना दि. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ पर्यंत सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांत नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस आदींद्वारे ऑनलाइन वीजबिल भरून योजनेत सहभागी होता येईल. मागील महिन्याच्या वीजबिलाची १० रुपयांपेक्षा अधिक थकबाकी नसावी. ऑनलाइन व संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, योजनेच्या कालावधीत ग्राहक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र राहील.
ज्या लघुदाब वीजग्राहकांनी सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे. तसेच दि. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीजबिल किंवा त्याचा ऑनलाइन भरणा केलेला नाही अशा ग्राहकांसाठी ही योजना आहे. लकी डिजिटल ग्राहक योजनेबाबत महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.





