पुणे : ग्रामविकास विभागाच्यावतीने जिल्ह्यातील १ जानेवारी २०२४ ते ४ मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकूण १०८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाकरीता एकूण आरक्षण निश्चित करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २७) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, येथे सोडत काढण्यात येणार आहे. सरपंचपदाची सोडत काढण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये आंबेगाव तालुक्यातील सहा ग्रामपंचायती आहेत. खेडमधील १८, शिरुरमधील ७, मावळमधील १६, मुळशीमधील १२, राजगड तालुक्यातील ५, पुरंदरमधील ८, बारामतीमधील १, इंदापूरमधील २०, दौंडमधील १० आणि हवेलीमधील ५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सोडतीसाठी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.