पुणे-लोणावळा लोकल सुरू

रेल्वेला पहिल्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद 

पुणे – बहुप्रतीक्षित पुणे-लोणावळा मार्गावर धावणाऱ्या उपनगरीय गाड्यांचा (लोकल) प्रवास सोमवारपासून सुरू झाला. परंतु, पहिल्या दिवशी मात्र प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याचे चित्र होते. 

राज्य सरकारच्या परवानगीनंतर, लोकल प्रवासास सुरूवात झाली आहे. पुणे-लोणावळा- पुणे दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये केवळ अत्यावश्‍यक सेवेतील नागरिकांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. “कन्फर्म तिकीट’ असल्यासच नागरिकांना प्रवेश देण्यात येत आहे. सोमवारपासून ही सेवा सुरू झाली.
रेल्वेकडून पुणे ते लोणावळा आणि लोणावळा ते पुणे या मार्गांवर ये-जा करणाऱ्या लोकलच्या 4 गाड्या सोडण्यात येत आहेत. लॉकडाऊनपूर्वी या मार्गांवर सुमारे 42 लोकल धावत होत्या.

लोकल सेवेच्या पहिल्या दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प होता. लोकल गाड्यांची क्षमता सुमारे 1200 गाड्यांची असते. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी धावलेल्या पुणे ते लोणावळा लोकलमध्ये 62 आणि लोणावळा ते पुणे लोकलमध्ये 67 जणांनी प्रवास केला. तर सायंकाळी धावलेल्या पुणे-लोणावळा लोकलमधून 75 आणि लोणावळा-पुणे लोकलमध्ये 15 जणांनी प्रवास केला.

डेक्कन क्वीनच्या प्रवाशांत वाढ
नोकरी, व्यवसाय आदी कारणांसाठी पुणे-मुंबई मार्गावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून “डेक्कन क्वीन’ला प्राधान्य देण्यात येते. या गाडीने दररोज हजारो नागरिक प्रवास करत होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये बंद असणारी डेक्कन क्वीनची सेवा गुरूवारपासून सुरू झाली. मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या गाडीमधील प्रवाशांची संख्या 500च्या घरात देखील पोहोचत नसल्याचे चित्र होते. मात्र, आठवड्याच्या पहिल्या दिवशी (सोमवारी) पुण्याहून सुमारे 708 प्रवासी “डेक्कन क्वीन’ने मुंबईकडे रवाना झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.