Pune : विमानतळावर दिसलेला बिबट्या अद्यापही मोकळाच

पुणे : लोहगाव विमानतळावर दिसलेला बिबट्या अद्यापही मोकळाच असून, त्या भागात लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये तो दिसल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले. मात्र, अद्याप तो वनविभागाने लावलेल्या कोणत्याच जाळ्यात सापडत नसल्याचे दिसून आले आहे.
१३ कॅमेरा ट्रॅप्स, चार पिंजरे आणि चार मॉनिटर करणारे कॅमेरे या भागात लावण्यात आले आहेत. मंगळवारी यातील एका कॅमेऱ्यात बिबट्या दिसला होता. मात्र, अद्याप या कोणत्याच ट्रॅपमध्ये तो अडकला नसून त्याचा मुक्त संचार या भागात सुरू आहे. या लावलेल्या कॅमेऱ्यांच्या सहाय्याने त्याचे मॉनिटरींग सुरूच आहे.
या भागात त्याची गुजराण बहुतांश भटक्या कुत्र्यांवरच असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. ज्यावेळी हा बिबट्या कॅमेऱ्यात दिसला होता, त्यावेळी त्याची हालचाल ही अॅग्रेसिव्ह नव्हती. त्यामुळे त्याची भूक या कुत्र्यांवरच भागत असावी, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ज्यावेळी त्याला अन्न मिळत नाही, त्यावेळी तो अन्नाच्या शोधार्थ वेगवान हालचाली करतो. अशावेळी तो प्राण्यांवर, माणसांवर हल्ले करतो. मात्र, सध्या असा कोणताच प्रकार या बिबट्याच्या बाबतीत दिसून आलेला नाही. त्यामुळे त्याची अन्नाची गरज भागत असावी, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. मात्र, अजूनही तो त्याच भागात फिरत असल्याने ही चिंतेची बाब आहे.




