प्रभात वृत्तसेवा बेल्हे – जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये नागरिक मृत्युमुखी पडल्यामुळे बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासह विविध १० मागण्यांसाठी आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा संघटक प्रकाश लामखडे यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वनमंत्र्यांच्या बैठकीत या समस्या मांडण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.यावेळी ‘आप’चे पुणे जिल्हा अध्यक्ष वैभव टेमकर यांनी या उपोषणाला पाठिंबा देत, सुमारे दीड ते दोन हजार बिबटे मानवी वस्तीत असण्याची शक्यता व्यक्त केली. पकडलेले बिबटे ताडोबा, अंधेरीसारख्या राखीव वनक्षेत्रात (२०० किमी पेक्षा दूर) सोडावेत, तसेच रेडिओ कॉलर लावून त्यांच्या संचारावर लक्ष ठेवावे, अशा प्रकारचा प्रकल्प राबवण्याची मागणी त्यांनी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर ठेवण्याचे आश्वासन दिले व उपोषण तात्पुरते स्थगित करण्याची विनंती केली. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिल्लारी यांनी दिला. यावेळी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि मंगरूळ पारगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख मागण्या.. प्रकाश लामखडे यांनी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास १ कोटी रुपये, अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये आणि जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने करावा, अशी मागणी केली होती. तसेच, पाळीव जनावरांच्या मृत्यूसाठी मोठी भरपाई (उदा. गाय/बैल मृत झाल्यास १ लाख रुपये) देण्यात यावी. याव्यतिरिक्त, बिबट निवारण कृती समिती स्थापन करणे, माणिकडोह निवारण केंद्राची क्षमता वाढवणे, बिबट्यांना टॅग लावून त्यांची नसबंदी करणे आणि पिंजऱ्यांची संख्या वाढवणे या मागण्यांचा समावेश होता.