प्रभात वृत्तसेवा पुणे – औंध, विमाननगर येथे बिबट्याने दर्शन दिल्यानंतर एनडीए-पाषाण रोडवरील बावधन परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. औंध, विमाननगरमधील बिबट्याला पकडण्यात अपयश आलेले असताना बावधनमध्ये बिबट्या दिसल्याने नागरिकांधील बिबट्याच्या दहशतीमध्ये वाढ झाली आहे. बिबट्या दिसलेल्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. बावधनमधील आदित्य-शगुन माॅल जवळच्या पदपथावरून बिबट्या जात असल्याचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला आहे. नेहमीप्रमाणे तो व्हिडिओ फेक, असल्याचे समजले गेले. प्रत्यक्षात हा व्हिडिओ एका व्यक्तीने काढला असून, सोमवारी (दि. १) मध्यरात्री २ वाजता बिबट्याचे दर्शन झाले. तो फूटपाथावरून जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. बिबट्याची शहानिशा झाल्यावर सगळ्यांना धडकी भरली असून वनविभागानेही बिबट्या असल्याच्या वृत्ताला दुजोरा देत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.