पुणे : जिल्हासह संपूर्ण राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा फटका पालेभाज्यांना बसला आहे. पालेभाज्यांची आवक मोठी होत आहे. मात्र, बाजारात दाखल होणारा ७५ टक्क्के माल ओला व खराब दर्जाचा आहे. परिणामी, शहरातील बाजारपेठांमध्ये दर्जेदार पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या भावात तेजी आली आहे. किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे भाव चाळीशीपर्यंत पोहोचले आहेत. येथील मार्केट यार्डात पुरंदर तालुका, हडपसर, उरळी कांचन, लोणी काळभोर, यवत परिसरात पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तेथून शहरात पालेभाज्या विक्रीसाठी पाठविल्या जातात. याखेरीज लातूर, तसेच नाशिक परिसरातून कोथिंबीर मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होते. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत असल्याने बाजारात पावसाचा मार बसलेल्या पालेभाज्या दाखल होत आहेत. ज्याठिकाणी पाऊस कमी झाला आहे, तेथून दर्जेदार पालेभाज्यांची आवक होत आहे. मात्र, हे प्रमाण अवघे पंचवीस टक्केच आहे. मालाच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने पावसाने भिजलेल्या पालेभाज्या पंधरा ते वीस रुपये, तर दर्जेदार पालेभाज्या वीस ते चाळीस रुपयांना मिळत असल्याची माहिती किरकोळ पालेभाज्यांचे विक्रेते सचिन कुलट यांनी दिली. मान्सूनपूर्व पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र, यामध्ये दर्जाहीन पालेभाज्यांचे प्रमाण जास्त आहे. पाऊस लवकर सुरू झाल्याने पालेभाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. तेथून बाजारात येईपर्यंत दर्जा आणखी खालवत आहे. – अमोल घुले, भाज्यांचे आडतदार, मार्केट यार्ड. पालेभाज्यांचे किरकोळ दर पुढीलप्रमाणे पालेभाजी………………दर (प्रतिजुडी) कोथिंबीर………………२५ ते ४० रुपये मेथी…………………..२० ते ३० रुपये शेपू……………………२० ते ३५ रुपये कांदापात……………..१५ ते ३० रुपये पालक………………..१५ ते ४० रुपये