Pune : हास्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते

पुणे : शारीरिक आरोग्याबरोबरच हास्यामुळे मानसिक आरोग्यही चांगले राहते. जगामध्ये आज १२० देशांत जागतिक हास्यदिन साजरा होत आहे. हास्यामुळे सकारात्मकता येते. सकारात्मक विचारांची माणसे समाजात चांगला बदल घडवतात. म्हणूनच ज्येष्ठांबरोबरच तरुण माणसेही या पद्धतीचा उपयोग करत आहेत. नवचैतन्य हास्ययोग परिवार ही समाज सकारात्मक करणारी आरोग्याची चळवळ आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
जागतिक हास्ययोग दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजिलेल्या विशेष हास्ययोग कार्यक्रमाला बावनकुळे उपस्थित होते. साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांचे आनंदाच्या वाटा या विषयावर व्याख्यान झाले. या वेळी भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, जयराज ग्रुपचे राजेश शहा, व्यावसायिक प्रकाश धोका, पितांबरी प्रॉडक्ट्सचे महेश जोशी, किरण दगडे पाटील, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे आणि सुमन काटे (व्हर्च्युअली), हास्ययोग परिवाराचे मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, खजिनदार ऍड. रामचंद्र राऊत, विश्वस्त जयंत दशपुत्रे, प्रमोद ढेपे, दत्तात्रय कुंदेन, ऍड. एकनाथ सुगावकर, सुनील देशपांडे, अतुल सलाग्रे, हरीश पाठक आदी उपस्थित होते.
आनंदी आणि सुदृढ समाजासाठी ही चळवळ मोलाचे योगदान देत आहे. एखाद्या चिकित्सेप्रमाणे आज हास्ययोग काम करत असून, जागतिक स्तरावर याला मान्यता आहे. विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू यांच्या पुढाकाराने एक लाख लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचणार, यात काही शंका नाही. ही चळवळ नागपुरातही सुरू व्हावी, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली.
डॉ. कळमकर, शहा, टिल्लू, जोशी यांचीही भाषणे झाली. विजय भोसले यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. हर्षदा टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. एकनाथ सुगावकर यांनी आभार मानले.





