Pune : भूमि अभिलेख विभागाचे कर्मचारी आजपासून संपावर

पुणे : भूमी अभिलेख कर्मचार्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला तांत्रिक वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्यात शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग या संघटनेने गुरुवारपासून (दि.15) बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. याबाबतचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष विजय मिसाळ यांनी राज्याचे जमाबंदी आयुक्त यांना दिले आहे.
भूमी अभिलेख विभागातील कर्मचार्यांना तांत्रिक वेतन श्रेणी देण्याकरिता शासनाने तत्कालीन जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशु यांचे अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करून अहवाल मागितला होता. त्याला जवळपास एक वर्षाचे वर कालावधी लोटला परंतु अद्यापपर्यंत त्या अहवालावर शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यभरातील कर्मचार्यांमध्ये वेतनश्रेणीच्या प्रश्नावर तीव्र असंतोष आहे.
तांत्रिक वेतनश्रेणीच्या प्रश्नासोबतच या खात्यात अलीकडच्या काळात स्वामित्व योजनेसारखी फार मोठी योजना कार्यवाही केली आहे. राज्यभरातील सुमारे चाळीस हजार गावांचे ड्रोन सर्व्हेद्वारे मोजण्याचे काम पूर्ण झाले असून, त्या गावातील मिळकतधारकांना हक्काच्या सनद वाटण्याचे कामसुद्धा वेगाने सुरू आहे.
तसेच, दैनंदिन मोजणीचे कामे फार मोठ्या प्रमाणात या खात्यामधून केले जात आहे. सुमारे 2000 कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत अशाही परिस्थितीत कर्मचारी वर्ग काम करीत आहे. हे प्रश्न मार्गी लागत नसल्याने भूमिअभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.





