Pune : मांजर पाळताय?.. परवाना घ्या !

पुणे, दि. 10 -मांजर पाळण्यासाठी आता महापालिकेचा परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी या निर्णयास मान्यता दिली आहे. दरम्यान, या परवान्यासाठी पुढील आठ दिवसांत ऑनलाइन नोंदणीची सुविधा महापालिकेकडून उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती डॉ. सारिका फुंडे यांनी दिली.
महापालिका अधिनियमानुसार कुत्रे, घोडे, मांजर अशा सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांची नागरिकांनी महापालिकेकडे नोंदणी करून परवाना घेणे आवश्यक आहे. पण शहरात केवळ कुत्रे व घोडे यांचा परवाना घेतला जात आहे; पण त्यांचीही संख्या कमी आहे. महापालिकेच्या माहितीनुसार शहरात एक ते दीड लाखांपर्यंत पाळीव कुत्रे आहेत; पण आत्तापर्यंत केवळ 5 हजार 500 कुत्र्यांची नोंदणी महापालिकेकडे झालेली आहे. कुत्र्यांसोबतच आता शहरात पाळीव मांजराच्या तक्रारी येत असून, काही वाद तर पोलीस ठाण्यापर्यंत गेले आहेत. त्यामुळे यापुढे कुत्र्यांप्रमाणेच पाळीव मांजराची नोंदणीही महापालिकेने बंधनकारक केली आहे.
मांजराची नोंदणी करण्यासाठी वार्षिक 50 रुपये इतके शुल्क निश्चित केले आहे. नोंदणीसाठी रहिवासी पुरावा, अँटिरेबीज लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो या तीन कागदपत्रांची गरज आहे.




