निवडणूक आयोगाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पुणे – राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी स्थगित केली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील 15 नगरपालिकांसाठी दि. 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी आता दि. 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. त्यामुळे आता प्रशासनाला ईव्हीएम सुमारे 17 दिवस सुरक्षित ठेवावे लागणार आहे. ऐनवेळी मतमोजणी पुढे ढकल्याने ईव्हीएमच्या सुरक्षिततेसाठी स्ट्राँग रूम तयार करणे, सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे आदींसाठी प्रशासनाला धावपळ करावी लागत आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशिन सुरक्षित ठेवण्यासाठी आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांंना सूचना दिल्या आहेत, तसेच आयोगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेशही दिले आहेत. यामध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊनच्या साठवणूक व व्यवस्थापनासाठी जबाबदार अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करावी. सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा अलार्म सिस्टीम, एक्झॉस्ट फॅन, फायर एक्स्टिंग्विशर इत्यादी उपकरणे कार्यान्वित असल्याची खात्री करावी व आवश्यक तेथे बॅरेकेटिंग करावे. गोडाउनसाठी २४ तास सशस्त्र सुरक्षा व्यवस्था तैनात करावी. केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश द्यावा व त्याची नोंद लॉगबुकमध्ये करावी. मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्रांवरील ऑन/ऑफ स्विच लक्षपूर्वक बंद करून ते पेटीत ठेवण्याची खात्री करावी, तसेच राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना गोडाउन व सुरक्षा व्यवस्थेची माहिती द्यावी आदी सूचना राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्यातील या नगरपालिकांचा समावेश जिल्ह्यातील लोणावळा, दौंड, तळेगाव दाभाडे, चाकण, जुन्नर, आळंदी, शिरूर, सासवड, जेजुरी, भोर, इंदापूर, राजगुरूनगर, वडगाव, माळेगाव बु आणि मंचर या नगरपालिकांसाठी मंगळवारी मतदान झाले. या नगरपालिकांची मतमोजणी दि. 21 डिसेंबर रोजी होणार आहे.