पुणे -बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर बुधवारी (दि.15) प्राप्तीकर विभागाने (आयटी) छापा टाकला. प्राप्तीकर विभागाने शहरात एकाच वेळी सहा ठिकाणी छापे टाकले. देशपांडे यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर उद्योग विश्व तसेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. देशपांडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. प्राप्तीकर विभागाने देशपांडे यांच्या कार्यालयावर तसेच निवासस्थानी छापे टाकले. या कारवाईत प्राप्तीकर विभागाच्या पथकाने काही कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साधने जप्त केली. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाने ही छापेमारी केली आहे. देशपांडे यांची सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड बांधकाम कंपनी आहे. या कंपनीचे कार्यालय डेक्कन जिमखाना भागातील फर्ग्युसन रस्ता तसेच हडपसर भागातील अमानोरा पार्क परिसरात आनखी एक कार्यालय आहे. देशपांडे यांचे कार्यालय आणि निवासस्थानातून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून या कारवाईत प्राप्तिकर विभागाच्या दिल्ली आणि मुंबईतील अधिकाऱ्यांचे पथक सहभागी झाले.