Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

पुणे : भाषा हाच समाजव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. दैनंदिन जीवनात भाषेला मोठे स्थान आहे. भाषा ही त्रिकालदर्शी असून, तिची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. भाषेची नाळ आजच्या संस्कृतीशी जोडली आहे. भाषा व संस्कृतीचे जतन व्हावे, असे मत ज्येष्ठ लेखिका डॉ. नीलिमा गुंडी यांनी व्यक्त केले. आजच्या काळात लोकांनी भाषेचे बोट सोडले असून, ते योग्य नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत भाषा, कविता आणि संस्कृती या विषयावर डॉ. गुंडी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की भाषा ही विविध काव्यसंग्रहाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली आहे. अनेक कवींनी आपल्या कवितेतून वैविध्यपूर्ण भाषेची मांडणी केली. भाषा ही समकालिन असून, काळानुसार त्यातील शब्द बदलत असतात. आधुनिक कवितेचे जनक केशवसुत यांनी पुढच्या पिढींतील लोकांना समजेल अशा शब्दांत कवितेचे लेखन केले.
विश्वाला गवसणी घालण्याचे काम भाषेच्या माध्यमातून कवींनी केले आहे. भाषा कोणतीही असो, ती टिकली पाहिजे व टिकवली पाहिजे, असा त्यांचा ध्यास होता. त्यासाठी अनेक कवी, लेखकांनी विशेष प्रयत्न केले आहे.
जगाला बदलून टाकण्याची ताकद भाषांमध्ये आहे. स्त्रियांचे दु:ख किती खोलवर रुजले आहे, हे सांगण्याचा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी प्रयत्न केला. स्त्रीचे दु:ख म्हणजे एक प्रकारचे व्रत असल्याचे कवयित्री इंदिरा संत यांनी सांगितले. दहा ते पंधरा वर्षांपासून कवींनी स्त्रीची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला. त्यात अरुण कोलटकर, सौमित्र यांचे नाव घेता येईल.
ग्रामीण व दलित साहित्यावरही भाषेचे प्रभुत्व आहे. कवी नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ यांनी समाजातील उपेक्षितांचा आवाज कवितेतून बुलंद केला, असेही डॉ. गुंडी म्हणाल्या. रामदास नेहुलकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.





