पुणे | बाप्पांच्या विसर्जनासाठी पुणे सज्ज

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अनंत चतुर्दशीला अवघे काही तास राहिले असून, गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
यंदाही मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशा पथक, बॅंड, ध्वजपथक याशिवाय विविध संस्था आणि संघटनांचा सहभाग या सगळ्या गोष्टींचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे.
मानाचा पहिला : श्री कसबा गणपती
श्रींच्या विसर्जन मिरवणुकीस सकाळी १० वाजता मंडई येथून सुरूवात होणार आहे. पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून ही मिरवणूक निघेल. दरवर्षी वेळेत मिरवणूक संपवतो,
याही वर्षी लवकर संपवण्यासाठी मिरवणूक लहान करत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी जाहीर केले. नगारखाना, गायकवाड यांचे सनईवादन, देवळणकर बंधूचे चौघडा वादन हे परंपरेप्रमाणे सहभागी होणार आहेत. तसेच रमणबाग, रुद्रगर्जना, परशुराम ही ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी होतील
मानाचा दुसरा : श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
सकाळी ९ वाजता श्री जोगेश्वरी चौकातील मांडवातून श्रींचे पालखीत विराजमान होऊन प्रस्थान सोहळा सुरू होईल.
सकाळी १०. ३० वा टिळक पुतळा (महात्मा फुले मंडई) येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीत ही पालखी सहभागी होईल. यामध्ये सतीश आढाव यांचे नगारावादन होईल.
तर, न्यू गंधर्व ब्रास बँड यंदा पुण्यात प्रथमच बँडवर “शिवतांडव’ धून वाजवणार आहे. तसेच समर्थ प्रतिष्ठान “भगवाधारी’ ताल रुपात अयोध्यापती अवतरणार आहेत. मिरवणुकीत शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाकडून मल्हारी मार्तंड- खंडोबाचा जागर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, कारगील विजयाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इंडियन आर्मीला ढोल-ताशा पथक मानवंदना देणार आहेत.
मिरवणुकीत विष्णूनाद पथकाचे कार्यकतें पालखी पुढे शंखनाद करतील. अब्दागिरी, मानचिन्हांसह श्री गणराय विराजमान असलेली चांदीची पालखी कार्यकर्ते स्वतः आपल्या खांद्यावरून वाहून मिरवणुकीमध्ये सहभागी होतील.
मानाचा तिसरा : श्री गुरुजी तालीम गणपती
सकाळी १०.३० वाजता लोकमान्य टिळक पुतळ्यापासून अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते आरती होऊन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. यामध्ये स्वप्नील सरपाले आणि सुभाष सरपाले यांनी बनवलेल्या फुलांच्या आकर्षक “सूर्य’ रथातून श्रींची वैभवशाली विसर्जन मिरवणूक सुरू होईल.
यामध्ये जयंत नगरकर यांचे नगारावादन असेल. तर, अश्वराज ब्रास बँड हे वादन करणार आहेत. “गर्जना’ ढोल-ताशा पथकासोबत पाॅवर लिफ्टिंग खेळाडूंचा समावेश असेल. याशिवाय अतुल बेहरे यांचे “नादब्रह्म’ ढोल-ताशा पथक व त्यांच्यासोबत तृतियपंथियांचे “शिखंडी’ पथक मिरवणुकीत वादन करणार आहेत.
मानाचा चौथा : श्री तुळशीबाग गणपती
सकाळी १०.३० वाजता टिळक पुतळा मंडई येथून पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदींच्या उपस्थितीत श्रींच्या मिरवणुकीस सुरुवात होईल.
यंदा बाप्पांची मिरवणूक जगन्नाथ पुरी रथातून निघणार आहे. फुलांनी सजवलेल्या ३२ फुट उंच रथातून ही मिरवणूक निघणार आहे. लकडी पुलावरील मेट्रो पुलामुळे उंचीला मर्यादा असल्याने हायड्रॉलिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
सरपाले बंधूंनी पुष्पसजावट केली आहे. रथावर श्री जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा या देवता विराजमान असतील. तसेच पुरी येथील श्री जगन्नाथाच्या रथाप्रमाणे बाप्पांचा रथ कार्यकर्तेच ओढणार आहेत. त्यात “शिवमुद्रा’चा गाजत असलेला श्री जगन्नाथचा ठेका असणार आहे.
मिरवणुकीत अग्रभागी लोणकर बंधूंचे नगारावादन, स्व-रुपवर्धनी, गजलक्ष्मी ही वाद्य पथके सहभागी होतील. मिरवणुकीत – स्वरूपवर्धिनीची मल्लखांबची प्रात्यक्षिकेही सादर केली जातील.
मानाचा पाचवा : श्री केसरीवाडा
महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. परंपरेप्रमाणे फुलांनी सजविलेल्या पालखीत गणराय विराजमान होणार आहेत.
श्रीराम, शिवमुद्रा, आवर्तन ढोल-ताशा पथक वादन करणार आहेत. तसेच बिडवे बंधुचा सनई-चौघडा मिरवणुकीत अग्रभागी असेल. इतिहास अभ्यासक मोहन शेटे हे लोकमान्यांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत.
विठ्ठलाची भव्य मूर्ती असलेला “माऊली’ रथ मिरवणुकीचे आकर्षण असेल. विसर्जन मिरवणुकीत “केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक, उत्सव प्रमुख डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणति रोहित टिळक, रौनक टिळक आदी सहभागी होणार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक दुपारी चार वाजता निघणार आहे. श्री “उमांगमलज’ रथामध्ये दगडूशेठचे बाप्पा विराजमान होणार आहेत.
आकर्षक विद्युत रोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती असणार आहे. नागाच्या फण्यावर हा तोललेला आहे, बाजूला २१ छोटे कळस लावण्यात आले आहेत. तर, रथावर २३ नंदींचे चेहरे बसवण्यात आले आहेत. रथावर ८ खांब साकारण्यात आले आहेत.
प्रत्येक खांबांवर बेलाच्या पानांचे डिझाइन आहे. रथामध्ये बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होणार आहेत. तेथे मोराचे डिझाइन साकारण्यात आले आहे.
युवा कलादिग्दर्शक विराज खटावकर यांनी हा रथ साकारला आहे. मिरवणुकीत रुग्णसेवा रथ अग्रभागी असेल. तर, प्रभात ब्रास बँड-दरबार ब्रास बँड हे वादन करतील. स्व-रूपवर्धिनीचे ढोल-ताशा पथक आपली वादनसेवा सादर करतील.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ७.३० वाजता राम जन्मभूमी, अयोध्याचे कोषाध्यक्ष आचार्य परमपूज्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते श्री गणपती बाप्पांची पूजा होईल. सकाळी ८:३० वाजता – भव्य रथातून विसर्जन मिरवणुकीसाठी मूर्तीचे प्रस्थान होईल.
वरद विघ्नेश्वर वाडा- बुधवार चौक – समाधान चौकमार्गे ही मिरवणूक मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे येईल. त्यानंतर सायंकाळी ८ वाजता तेथून मिरवणुकीत प्रस्थान होईल. समाधान चौकमार्गे लक्ष्मी रस्त्याने टिळक चौक मार्गे ही मिरवणूक मार्गस्थ होईल.
श्री शारदा गजानन – अखिल मंडई मंडळ
अखिल मंडई मंडळाची विसर्जन मिरवणूक मंगळवारी सायंकाळी ७ वाजता निघणार आहे. शारदा गजाननाची ही मिरवणूक “आदिशक्ती’रथातून निघणार आहे. रौद्र रुपातील कालीमातेची १५ फूट उंचीची मूर्ती यामध्ये असेल.
दरवर्षी मिरवणुकीत श्री शारदा गजाननाचे फक्त समोरुनच दर्शन घेता येते त्यामुळे यंदा प्रथमच शारदा गणपतीची मूर्ती ६० अंशात फिरणार असून, दोन्ही बाजूने भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
रथाची उंची कमी करण्यासाठी हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात आले आहे. मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १३१ वे वर्ष आहे. रथाचा आकार १४ बाय १८ आणि उंची २७ फूट आहे.
मेट्रोच्या लकडीपूल येथील पूलामुळे हायड्रोलिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. कलादिग्दर्शक विशाल ताजणेकर आणि सहकाऱ्यांनी रथ साकारला आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन, गंधर्व बँड आणि शिवगर्जना आणि शिवमुद्रा वाद्य पथक आपली कला सादर करतील.





