पुणे – शहरात काल रात्री 2 तर आज (दि. 3) दिवसभरात करोनाचे नवीन 9 असे एकूण 11 रुग्ण आढळून आले. दोन दिवसांपासून बाधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला असून त्यामध्ये ग्रामीण भागातील एका रुग्णाचा समावेश आहे. या सर्वांवर नायडू आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून करोना बाधितांची संख्या आता 71 वर जावून पोहोचली आहे.
शहरात मागील 12 दिवसांपासून लॉकडाऊन केले आहे. त्याचा परिणाम म्हणजे साधारण चार दिवसानंतर शहरातील बाधितांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली. 48 तासांत एकही नवीन रुग्ण न सापडल्यामुळे आरोग्य आणि प्रशासन विभागात समाधानाचे वातावरण होते.
मात्र, नागरिकांचा बेजबाबदारपणा आणि शंभर टक्के लॉकडाऊन झाले नसल्यामुळे शहरात पुन्हा झपाट्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. दररोज, तीन ते चार या संख्येने रुग्ण वाढत असताना मागील दोन दिवसांत ही संख्या आता सात ते आठ या पटीत वाढू लागली आहे.
गेल्या 24 तासात 9 तर आज दिवसभरात (संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत) 8 असे एकूण 17 नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, आणखी 15 जणांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत, त्याचा अहवाल संध्याकाळपर्यंत येईल, अशी माहिती महापालिका सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. दिवसभरात सापडलेल्या दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, एकाच घरातील हे दोन व्यक्ती आहेत, त्यांचा परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. त्यामुळे त्यांना संसर्गातूनच लागण झाली असून, त्याच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती घेऊन तपासणीही केली जात आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मुळशी तालुक्यात एक जण बाधित…
दिवसभरात सापडलेल्या बाधित रुग्णांमध्ये मुळशी तालुक्यातील गावामध्ये एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. हा व्यक्ती एक व्यवसायिक असून गावाच्या माध्यभागातच हा राहत आहे. त्याची आणि त्याच्या पत्नीची करोना तपासणी केली असता, पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. यावेळी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह तहसीलदार आणि अन्य अधिकारी यांनी गावात जाऊन संपूर्ण गाव क्वारन्टाइन करण्यात येत असल्याचे सांगितले. तर, त्या व्यक्तीला संसर्ग कसा झाला, तो कुठे गेला होता, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी सांगितले. तसेच, अन्य बाधित व्यक्ती हे शहाराच्या मध्यवस्तीतील आहेत.