Pune : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १३ फेब्रुवारीपासून

पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या विद्यमाने आयोजित २३वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा दि. १३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पुणे फिल्म फाउंडेशनचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी गुरूवारी दिली. यावेळी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, विश्वस्त डॉ. सतीश आळेकर, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम आणि फिल्म), उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क आणि समन्वय) उपस्थित होते.
पीव्हीआर, पॅव्हिलियन मॉल, आयनॉक्स – बंडगार्डन आणि सिनेपोलीस-औंध येथे ११ स्क्रीनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जागतिक आणि मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभाग यामध्ये सुमारे १५० हून अधिक देशी-विदेशी चित्रपट रसिक प्रेक्षकांना बघता येतील. “शोमॅन राज कपूर यांची १०० वी जयंती’ ही या वर्षीची थीम असणार आहे. यासाठी १५ जानेवारीपासून नोंदणी सुरू होणार आहे.
जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात यंदा १०७ देशांमधील १,०५० हून अधिक चित्रपटांनी सहभाग नोंदवला होता. यातील १४ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरींमार्फत अंतिम फेरीतील हे १४ चित्रपट बघून सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय चित्रपट निवडला जाईल. त्याला १० लाख रुपयांचा महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.





