पुणे : अंतर्गत राजकारण अन्‌ विद्यार्थ्यांचं मरण!

पुणे विद्यापीठस्तरीय परीक्षांसाठी एजन्सी ठरेना : नियोजनासाठी धावपळ


साडेसहा लाख विद्यार्थी वेठीस

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची परीक्षेसाठी एजन्सी नेमण्याविषयी अजूनही अनिश्‍चितता आहे. पूर्वीची एजन्सी कायम ठेवावी, असे परीक्षा विभागाचे म्हणणे आहे. तर पूर्वीच्या एजन्सीची निवड ही एकाच सत्रासाठी होती. त्यामुळे हे काम पुन्हा निविदांद्वारे नवीन एजन्सीला देण्याचा आग्रह धरला जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या परीक्षेच्या कामासाठी एजन्सी निवडीवरून विद्यापीठातील अंतर्गत राजकारण पुढे आले आहे. यामुळे सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा मात्र लांबणीवर पडणार आहे.

नगर, नाशिक आणि पुण्यातील पदवी व पदव्युत्तरच्या प्रथम सत्राची परीक्षा दि. 15 मार्चपासून घेण्यात येणार असल्याचे यापूर्वीच विद्यापीठाने जाहीर केले आहे. त्यानुसार परीक्षा विभागाकडून कामाचे नियोजन सुरू आहे. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत परीक्षेसाठी नवीन एजन्सी नेमण्याविषयी प्राथमिक चर्चा झाली. त्यातून आगामी परीक्षा नवीन एजन्सीद्वारे घ्याव्यात, यासाठी व्यवस्थापन परिषदेचे काही सदस्य आग्रही असल्याचे दिसून येत आहे.

याउलट परीक्षा विभागाने पूर्वीची एजन्सीकडून परीक्षा होणार असल्याचे गृहित धरून परीक्षेचे नियोजन सुरू केले. परीक्षा पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना, आता नव्या एजन्सीची चर्चा होत आहे. त्यावरून परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. नवीन एजन्सीची निवड प्रक्रियेसाठी निविदा आणि त्यांना सर्व कामकाज समजण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल. त्यामुळे किमान महिनाभर परीक्षा पुढे ढकलावी लागणार आहे. त्यामुळे पूर्वीची एजन्सी कायम ठेवल्यास परीक्षा वेळेत घेणे शक्‍य होणार असल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्व वादात मात्र तब्बल साडेसहा लाख विद्यार्थी भरडले जात असल्याचे चित्र आहे.

परीक्षा वेळेत घ्या….
“परीक्षेसाठी कोणतेही एजन्सी नेमा. पण, तांत्रिक अडचणी दूर करत परीक्षा सुरळीत घ्यावी, हीच पालकांची अपेक्षा आहे. मात्र, एजन्सीचे काय गौडबंगाल आहे, हे माहिती नाही. परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायची, त्याचे वेळापत्रकही प्रसिद्ध झाले नाही. विद्यार्थीही गोंधळात आहेत. त्यांना वेठीस का धरता? अशा परिस्थितीत विद्यापीठाने ठोस निर्णय घेत वेळेत परीक्षा घेतली पाहिजे,’ ही मागणी पालकांतून होत आहे.

विद्यापीठाची भूमिका गुलदस्त्यात
विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवत कामकाज करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची भूमिका मात्र परीक्षेच्या एजन्सीवरून अद्यापही गुलदस्त्यात आहे. नवीन एजन्सी निवडायची, की पूर्वीची एजन्सी कायम ठेवायची, याचे सर्वाधिकार कुलगुरूंना आहेत. तरीही याबाबत विद्यापीठाकडून धर-सोड का होत आहे? परीक्षा काही दिवसांवर असतानाही एजन्सीच्या निर्णय एवढ्या अंधारात का ठेवला जात आहे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षेसाठी एजन्सी तीच राहणार की बदलणार, हा विद्यापीठाच्या अंतर्गत विषय आहे. तसेच ही बाब गोपनीय आहे. त्याविषयी जास्त सांगणे योग्य ठरणार नाही. मात्र, परीक्षेचे काम वेगाने सुरू आहे.
– डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.