पुणे – महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील सुमारे 626 कर्मचाऱ्यांची सेवा कागदपत्रांच्या तपासणीनंतर नाकारण्यात आली होती. मात्र, शासनाच्या आदेशानुसार या गावांमधील संबंधित कर्मचाऱ्यांची कागदपत्रे पुन्हा घेण्यात आली असून जिल्हा परिषदेकडे ही तपासणी सुरू आहे. दरम्यान, ही तपासणी करताना महापालिकेत 2017 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 11 गावांमधील कर्मचाऱ्यांना लावलेल्या कायद्याच्या निकषावरच उर्वरीत कर्मचाऱ्यांना समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून महापालिकेकडे करण्यात आली आहे. महापालिकेची हद्दवाढ करत 2021 मध्ये शासनाकडून 23 गावांचा समावेश पालिकेत करण्यात आला. त्यानंतर, या गावांच्या ग्रामपंचायतीमधील कर्मचारी पालिकेत रुजू करून घेण्यावरून आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या समितीने या गावांतील 1124 कर्मचाऱ्यांपैकी 454 कर्मचारी पात्र ठरविले तर उर्वरीत 626 कर्मचाऱ्यांची सेवा नाकारण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी देण्याचा आदेश दिल्यानंतर आता पालिकेने अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांची कागदपत्रे मागविली होती. ही कागदपत्रे महापालिके जिल्हा परिषदेकडे देण्यात आली आल्यानंतर त्यांची तपासणी अंतीम टप्प्यात असून लवकरच याबाबतचा अहवाल शासन तसेच महापालिकेस दिला जाणार आहे. 23 गावांमधील सुमारे 626 कर्मचाऱ्यांची सेवा या कागदपत्रांच्या तपासणीनंतर निश्चित होणार आहे.त्यामुळे याबाबत जिल्हा परिषद प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे मुद्दे… गावे समाविष्ट झाले तेव्हाची कर्मचारी संख्या : 1124 पात्र झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या : 454 अपात्र झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या : 626 पहिल्या सुनावणीस अनुपस्थित कर्मचारी : 44