पुणे ( संजय कडू ) – विमानतळ भागात गॅस सिलिंडरचा बेकायदा साठा करून ठेवलेल्या गोदामात बुधवारी दुपारी स्फोट झाला. एकापाठोपाठ सहा ते आठ सिलिंडरचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. या गंभीर घटनेची पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी तत्काळ दखल घेत अप्पर पोलीस आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान संबंधीत गोडाऊन एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आशिर्वादाने सुरु होते तसेच संबंधीत चालक नेहमी कर्मचाऱ्यास पोलीस ठाण्यात येऊन भेटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विमाननगरमधील सिंबायोसिस कॉलेजजवळ रोहन मिथिला नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथे जवळच मजुरांची वसाहत (लेबर कॅम्प) आहे. वसाहतीच्या परिसरात काही अंतरावर एका गोदामात बेकायदा घरगुती, तसेच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचा मोठा साठा करण्यात आला होता. बुधवारी गोदामातील सिलिंडरला आग लागली आणि एकापाठोपाठ दहा सिलिंडरचे स्फोट झाल्याने परिसरा हादरला. याची झळ शेजारी असलेल्या मजुरांच्या झोपड्यांना पोहोचली. मजुरांच्या झोपड्या आणि गृहपयोगी साहित्य आगीत भस्मसात झाले. अग्निशमन दलातील ३० जवानांनी गोदामात साठवणूक केलेले १०० सिलिंडर बाजूला काढले. वसाहतीतील महिला आणि मुले बाहेर पळाल्याने बचावले. या घटनेमुळे गॅसचा काळाबाजार समोर आला असून या प्रकरणाची आता अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीअंती मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात काहीजण बेकायदा गॅस सिलिंडरचा साठा करत आहे. घरगुती, तसेच व्यावसायिक वापराचे सिलिंडर जादा दराने विक्री करत असून, पत्र्याचे शेडमध्ये बेकायदा सिलिंडरचा साठा करुन ठेवत आहेत. बेकायदा सिलिंडर साठवणूक करण्यात आलेल्या गोदामांना आग लागल्याची घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. स्थानिक पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष? स्फोट झालेल्या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल १०० हून अधिक सिलेंडर बाहेर काढले. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा करून त्याची वाहतूक, विक्री सुरू असताना स्थानिक पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आला नाही का, असा प्रश्न यानिमित्ताने नागरिक विचारत आहेत. या प्रकरामुळे स्थानिक पोलिसांची यंत्रणा फेल ठरली. घटनेत सुदैवाने जिवीतहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी तपास सुरु असून जागा मालकास अटक करण्यात आले आहे. मात्र चालक अद्याप सापडला नाही. तो सापडल्यानंतर तो कोणत्या एजन्सीकडून सिलेंडर घेत होता हे समजले. त्याप्रमाणे संबंधीत एजन्सीवरही कारवाई करण्यात येईल. – आनंदराव खोबरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ)