विभागीय उच्च शिक्षण विभागाचे आदेश
पुणे – विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी त्यांची उपस्थितीबाबतची माहिती नमूद करावी. त्यासाठी शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांनी दि. 10 एप्रिलपर्यंत पाठवावेत, अशा सूचना पुणे विभागीय उच्च शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरून भरलेल्या अर्जावर शैक्षणिक संस्था स्तरावरून मान्यता देणे आवश्यक आहे. त्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज शैक्षणिक स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची उपस्थितीची माहिती क्लॉक लॉगीनमध्ये नमूद करावे. ते पुढे प्राचार्य लॉगीनवर पाठवावेत. प्राचार्य लॉग-इनमधून विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज वेळेत पुढील टप्प्यावर पाठविणे महत्त्वाचे आहे. महाविद्यालय, संस्था अथवा विद्यापीठांनी कोणत्याही परिस्थितीत एकही अर्ज प्रलंबित ठेवू नये, अशा सक्त सूचना उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी दिल्या आहेत. प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नसून, मुदतीनंतर प्रलंबित अर्जाबाबत उद्भवणाऱ्या बाबीस विद्यापीठाचे कुलसचिव, महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार असतील, असेही नारखेडे यांनी स्पष्ट केले आहे.