Pune : भिक्षेकऱ्यांच्या मेहनतान्यात वाढ

पुणे : महिला व बाल विकास विभागाच्या शासकीय भिक्षेकरी गृहातील प्रवेशित भिक्षेकऱ्यांना मेहनतान्यात वाढ करण्यात आली आहे. आता यापुढे भिक्षेकऱ्यांना प्रतिदिन ४० रुपये याप्रमाणे मेहनताना मिळणार आहे.
भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी राज्यामध्ये एकूण १४ शासकीय भिक्षेकरी गृहे कार्यान्वित असून, त्यांची एकूण प्रवेशित क्षमता ४ हजार १२७ एवढी आहे. या संस्थेत दाखल असलेल्या प्रवेशितांना जर ते वैद्यकीयदृष्ट्या पात्र असतील, तर सर्वसाधारणपणे प्रत्येक कामाच्या दिवशी ८ तास काम करणे आवश्यक असेल, अशी तरतूद आहे.
जी व्यक्ती तिच्यासाठी तरतूद केलेल्या प्रशिक्षणात समाधानकारक प्रगती दर्शवेल किंवा जिची वर्तणूक चांगली असेल, अशा व्यक्तीस दरमहा पाच रुपये याप्रमाणे मेहनताना म्हणून उपदान देण्याची तरतूद आहे. भिक्षेकरी प्रवेशितांमधील आळशीपणा कमी होऊन काम करण्याची वृत्ती वाढीस लागण्याच्या दृष्टीने, तसेच भिक्षेकरी गृहांमधून बाहेर पडल्यानंतर स्वतःचा उदरनिर्वाह करता यावा, यासाठी शेती तसेच लघुउद्योगाचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यापोटी मेहनताना म्हणून उपदान देण्यात येते.
भिक्षेकऱ्यांना देण्यात येत असलेला मेहनताना खुप कमी आहे. गेल्या अनेक वर्षांत त्यात वाढ करण्यात आलेली नव्हती. त्यात बदल करून भिक्षेकऱ्यांना देण्यात येणाऱ्या उपदानाची रक्कम वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या प्रस्तावास मान्यता प्राप्त झाली असून, त्यानुसार शासनाने अंमलबजावणी आर्थिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास विभागाचे अवर सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.





