Pune : क्रेडिट नोटमधून ४५ कोटींचा मिळकतकर

पुणे : शहरातील डीपीमधील रस्ते विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. त्यामुळे महापालिकेकडून शहरातील अनेक रस्ते पीपीपी तत्त्वावर विकसित केले जात असून, त्या बदल्यास संबंधित ठेकेदारास महापालिकेकडून क्रेडिट नोट दिली जाते.
या नोटमधून संबंधित ठेकेदाराला महापालिकेचा मिळकतकर, पाणीपुरवठ्याचे बिल, तसेच महापालिकेची वेगवेगळी देणी देण्यास मुभा आहे. त्याअंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात ७५३ मिळकतींचा ४५५.७० लाख रुपयांचा कर क्रेडिट नोटमधून भरण्यात आला आहे.
त्यामुळे विकसकांकडून क्रेडिट नोटचा वापर सुरू करण्यात आला असला, तरी ज्या प्रमाणात क्रेडिट नोट देण्यात आली आहे. त्या प्रमाणात ही रक्कम कमीच असल्याचे चित्र आहे.
महापालिकेकडे मागितली होती माहिती
ज्या ठेकेदारांना हे क्रेडिट नोट दिली आहेत. ते शहरातील मिळकतधारक, बांधकाम व्यावसायिक यांना देऊ शकतात. त्यासाठी संबधितांना सवलत देऊन ते नोट दिली जातात. मात्र, अनेक ठेकेदारांकडे ती शिल्लक असून, कोणीही ती घेण्यासाठी पुढे येत नसल्याने या ठेकेदारांनी महापालिकेकडून मोठ्या थकबाकीदारांची माहिती मागण्यात आली होती.
मात्र, महापालिकेकडून त्यास नकार देण्यात आला. त्यानंतर अनेक ठेकेदारांनी महापालिकेकडे क्रेडिट नोट परवडत नसल्याची भूमिका मांडली होती. मात्र, आता काही प्रमाणात सवलत देऊन ती दिले जात असल्याने मोठ्या थकबाकीदारांना कर भरताना आर्थिक फायदा होत असल्याने गेल्या वर्षभरात ४५ कोटी ७० लाखांचा कर क्रेडिट नोटने भरण्यात आला आहे.





