Pune : मिळकतकर विभाग ठप्प

पुणे : आर्थिक वर्ष संपत असल्याने मार्च अखेर पर्यंत महापालिकेची मिळकतकराची देणी तसेच इतर कामे पुर्ण करण्यासाठी पुणेकरांची लगबग सुरू असतानाच महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या संगणक यंत्रणेत (सर्व्हर सिस्टीम) बिघाड झाला आहे. त्यामुळे, मागील पाच दिवसांपासून ही यंत्रणा संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना मिळकतकर भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महापालिकेकडून एका खासगी कंपनीच्या माध्यमातून ही संगणक प्रणाली अपडेट केली जाणार असून, त्यासाठी ही प्रणाली वापरण्याचे अधिकार खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले असल्याने हे कामकाज संथ झाले असल्याची माहिती समोर आली असून, हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न मिळकतकर विभागात सुरू असल्याचा आरोप होत आहे.
या वर्षी महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. त्यामुळे मार्च अखेर पर्यंत विभागाने आणखी ५०० कोटी रूपये वसूल करण्याचे उद्दीष्ट आयुक्तांनी दिले आहे. असे असतानाच अचानक या प्रणालीत बिघाड झाल्याने संशयाचे वातवरण तयार झाले आहे. अनेक नागरिक आर्थिक वर्षाच्या शेवटया महिन्यात मोठया प्रमाणात कर भरतात मात्र, अचानक प्रणाली बंद पडल्याने अनेकांना पैसे भरता आलेले नाहीत.
त्याच वेळी मिळकतीवरील नाव बदलणे, नवीन मिळकतीची नोंदणी करणे, आगामी आर्थिक वर्षासाठी मिळकतकाराचे बिल तयार करणे, पीटी ३ अर्ज भरलेल्या नागरिकांचे बिल तयार करणे यासह अनेक महत्त्वाची कामे सध्या मिळकतकर विभागात सुरु आहेत. महापालिकेतर्फे दरवर्षी १४ लाखापेक्षा जास्त मिळकतकराची बिले तयार केली जातात. ही बिले एक एप्रिलपासून ऑनलाइन दिसणे आवश्यक आहेत. असे असतानाच पाच दिवसांपासून ही प्रणाली बंद असल्याने सर्व कामकाज ठप्प आहे.
कर्मचारीही गायब
संगणक प्रणालीत बिघाड झालेल्या नागरिकांची मिळकतकराशी संबधित तसेच इतर कोणतीही कामे होत नसल्याने या विभागाचे कर्मचारी महापालिकेतून काम सोडून गायब होत आहेत. नागरिकांनी विचारणा केलीच, तर इतर सहकारी कर्मचारी संबधित कर्मचारी बैठकीला अथवा साईट व्हिजीटला गेल्याचे सांगत नागरिकांची बोळवण करित आहेत.
जुने सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे, त्यामुळे सध्या कामकाज संथ गतीने सुरु आहे. आज ही सेवा पूर्ववत झाली आहे.
– माधव जगताप, उपायुक्त, मिळकतकर विभाग





