pune : ताथवडे म्हाडा प्रकल्पासाठी उत्पन्नाची अट शिथिल

६३४ घरांसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात
पुणे – पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) दुसऱ्या टप्प्यात ६३४ सदनिका रिक्त असून, या सदनिकांचे संगणकीय सोडत पद्धतीने वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठीची जाहिरात म्हाडाकडून काढण्यात आली असून, सोमवारपासून नोंदणी प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला आहे.
दरम्यान, ही सर्व प्रक्रिया २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, म्हाडाकडून या शिल्लक सदनिकांसाठी उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही उत्पन्न गटातील इच्छुक या सदनिकांसाठी अर्ज करू शकणार आहेत, अशी माहिती म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे.
म्हाडाकडून ताथवडे येथे एकूण ७९२ सदनिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २४ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी, ७६८ सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी होत्या. त्यानुसार २४ सदनिकांसाठी ४३८ अर्ज प्राप्त झाले.
एकूण सदनिकांपैकी १५० सदनिकांच्या वितरणाची कार्यवाहीही सुरू करण्यात आली होती, तर उर्वरीत ६३४ सदनिकांसाठी दुसऱ्यांदा जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार या शिल्लक या सदनिकांच्या नोंदणीची प्रक्रिया सोमवारी सुरू करण्यात आली.
म्हाडाचे सभापती आढळराव पाटील यांच्या उपस्थिती ही प्रक्रिया सोमवारी करण्यात आली. या वेळी पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे, नोडल अधिकारी तथा मंडळाचे उपमुख्य अधिकारी राहुल शिळीमकर, रामचंद्र भोसले, मिळकत व्यवस्थापक रूपेश जायभाये यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, प्रत्येक सदनिकेसाठी विनामूल्य फोर व्हिलर पार्किंग, स्विमिंग पूल, इंडोअर गेम एरिया, मुलांसाठी खेळण्याची जागा, सोलार ऑन-ग्रीड, ईव्ही चार्जिंग, क्लब हाऊस, ओपम जिम, रेन वाॅटर हार्वेस्टिंग आदी सुविधा देण्यात येणार आहेत. म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून योजनेतील सदनिकांसाठी अर्ज करण्यात यावे, असे आवाहन आढळराव पाटील यांनी केले आहे.





