पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार अखेर शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे यांच्याकडे सोपवला आहे. यामुळे विद्या प्राधिकरणातील अधिकाऱ्यांमध्ये “कही खुशी कही गम’ अशी अवस्था आहे.
सहसंचालकांची दोन पदे गेल्या पाच वर्षांपासून रिक्त आहेत. यातील एक पद प्रशासन व एक पद प्रशिक्षण या वर्गासाठी आहे. मागील काही वर्षांपासून या पदांवर कोणाचीच पूर्णवेळ वर्णी लावलेली नाही व फारसे कोणी इच्छुकही नव्हते. 8 डिसेंबर 2020 पासून सेवा ज्येष्ठतेनुसार प्रशिक्षण वर्गातील प्राचार्य डॉ. विलास पाटील यांच्याकडे सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. तो नुकताच संपुष्टात आणण्यात आला आहे.
औरंगाबाद येथील राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या (मिपा) शिक्षण उपसंचालक पदी रमाकांत काठमोरे यांची 16 डिसेंबर 2020 रोजी पदस्थापना करण्यात आली होती. त्यांनतर 20 जुलै 2021 मध्ये त्यांच्याकडे “मिपा’च्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता. त्यांनतर आता त्यांची विद्या प्राधिकरणाच्या सहसंचालक पदी अतिरिक्त कार्यभाराने वर्णी लावली आहे. काठमोरे यांना एकूण तीन पदांचे कामकाज सांभाळावे लागणार आहे.
विद्या प्राधिकरणातील सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार रमाकांत काठमोरे यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सुपूर्द करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी जारी केले आहेत. दरम्यान सेवाज्येष्ठता डावलून काठमोरे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याने अधिकाऱ्यांच्या एका गटात अस्वस्थता, तर दुसऱ्या गटात आनंदाचे वातावरण आहे.