Pune | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी गडकरी मैदानात

पुणे – कात्रज-कोंढवा रस्ता ८४ मीटरचा करण्यासाठी आता थेट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी मैदानात उतरले आहेत. या चार किलोमीटरच्या रस्त्याचे ८४ मीटरसाठी आवश्यक असलेले भूसंपादन करता येत नसल्याने महापालिकेने हे भूसंपादन ५० मीटरच करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, हा रस्ता ८४ मीटर असणे आवश्यक असून महापालिकेने भूसंपादन करून दिल्यास हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) माध्यमातून करून देण्याची तयारी गडकरी यांनी दर्शविली असल्याचे महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
महापालिकेने गडकरी यांनी केलेल्या सूचनेनुसार लवकर भूसंपादन करून द्यावे, आमच्या विभागातर्फे हा रस्ता करून दिला जाईल असे सांगितले आहे. पालिकेला आता आणखी ८४ मीटरचे भूसंपादन करायचे असल्याने त्यासाठी सुमारे १७ हजार २०० चौरस मिटर जागा आवश्यक आहे. त्यासाठी सुमारे १२४ कोटी रुपये लागणार आहेत. यातील ५० टक्के निधी राज्य सरकारकडून मिळावा यासाठी पालिकेकडून प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
गडकरींनीच केले होते भूमीपूजन…
केंद्र शासनाने फुरसुंगी ते कात्रज हा रस्ता महामार्ग घोषीत केला आहे. तसेच, या रस्त्यावरून शहरातील नगर रस्ता आणि सोलापूर महामार्गावरून आलेली सर्व अवजड वाहनांची वर्दळ २४ तास सुरू असते. त्यातील कात्रज-कोंढवा रस्ता ८४ मीटर करण्याच्या रूंदीकरणाचे भूमिपूजन ३१ ऑक्टोबर २०१८ मध्ये केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
मात्र, त्यानंतर कात्रज येथील राजस सोसायटी ते कोंढवा येथील खडी मशिन चौक या सुमारे साडे तीन किलोमीटर लांबीच्या रस्ताच्या रुंदीकरणासाठी निविदा काढल्या. पण, जागाच ताब्यात नसल्याने हा रस्ता गेल्या सहा वर्षांपासून रखडला आहे.
हे काम रखडल्याने भूसंपादनासाठी ७१० कोटी रुपयांची आवश्यकता होती. महापालिकेने दाखविलेल्या उदासीनतेमुळे जागा मालकांना पैसे मिळाले नाहीत आणि त्यांनी टीडीआर, एफएसआयच्या बदल्यात जागा ताब्यात देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा रस्ता ५० मीटर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून या भूसंपादनासाठी शासनाने १८० कोटींचा निधी सहा महिन्यांपूर्वी महापालिकेस दिलेला आहे.





