पुणे : “तिच्या जागी माझी बहीण असती तर…” ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांमुळेच हल्लेखोर जाळ्यात

पुणे – तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी मिळेल त्या वस्तूने मारहाण करण्यास सुरुवात केली होती. कुंड्या, दगड, प्लायवुडचे तुकडे फेकून मारण्यात येत होते. आरोपी तरुण काही वेळातच “मॉब लिचींग’चा बळी ठरणार होता. मात्र इतक्यात स्पर्धा परिक्षेच्या पाच विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला नागरिकांच्या तावडीतून वाचवले. या विद्यार्थ्यांनी रिंग करुन त्याला सुरक्षितपणे पेरुगेट पोलीस चौकीपर्यंत पोहचवले.
तिच्या जागी माझी बहीण असती तर…
तरुणीला वाचवण्यासाठी धाव घेणारा सतीश नेहून म्हणाला, आरोपीला पकडण्यासाठी धाव घेताना मला भीती वाटली होती. मात्र तिच्या जागी माझी बहीण असती तर तिला मी काय केले असते? असा विचार मनात आला आणि मी तिला वाचवण्यासाठी धावत सुटलो. तोवर लेशपाल आणि हर्षदने आरोपीच्या हातातून कोयता काढून त्याच्यावर नियंत्रण मिळवले होते. आरोपी अतिशय आक्रमक झाल्याने तो आवरणे कठीण होते. आम्ही सर्वांनी धाव घेत त्याच्यावर नियंत्रण मिळवले.
ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. तेव्हा जवळील वाचनालयातून बाहेर आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना एक तरुण तरुणीच्या मागे कोयता घेऊन धावताना दिसला. एमपीएससी टॉपर दर्शना पवारचे खून प्रकरण ताजे असतानाच डोळ्यासमोर असे काही घडताना पाहून त्यांना धक्का बसला. यातील लेशपाल जवळगे याने धाडस दाखवत आरोपी शंतनू जाधवच्या मागे धाव घेतली.
आरोपी तरुणीवर कोयत्याने वार करत असतानाच लेशपालने त्याला धक्का देऊन खाली पाडले. यानंतर मागून आलेल्या हर्षद पाटील याने आरोपीच्या हातातील कोयता खेचून घेतला. त्यांच्या मदतीला सतीश नेहूल आणि इतर विद्यार्थी धावले. काही नागरिक आणि तरुणांनीही धाव घेत शंतनूला मिळेल त्या वस्तूने मारण्यास सुरुवात केली. नागरिकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शंतनूला घेराव घालून वाचवले. त्याला पकडून शेजारील पेरुगेट पोलीस चौकीत नेले.




