Pune Hospital News : पुणे शहरात राज्यभरातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने आयसीयू बेडची कमतरता जाणवत आहे. शहरात येणाऱ्या गंभीर रुग्णांना वेळेत आयसीयू बेड उपलब्ध व्हावेत. यासाठी पुढील दहा वर्षांचा सविस्तर रोडमॅप तयार केला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना दीपक बोर्डीकर-साकोरे यांनी दिली. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल कांबळे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. शहरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये आयसीयू बेडची कमतरता भासत असल्याने गंभीर रुग्णांना बेड मिळण्यासाठी नातेवाईकांना अनेक रुग्णालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. वाढती लोकसंख्या, बाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या आणि मर्यादित सुविधा यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब कांबळे यांनी लक्षवेधीद्वारे मांडली. या परिस्थितीवर शासन कोणती उपाययोजना करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे म्हणाल्या की, पुणे शहरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्यामुळे आसपासच्या जिल्ह्यांमधून तसेच राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येथे येतात. इंडियन पब्लिक हेल्थच्या निकषांनुसार सुमारे २८०० रुग्णांमागे एक आयसीयू बेड उपलब्ध असणे आवश्यक आहे. पुण्यात शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये मिळून सुमारे २४०० आयसीयू बेड उपलब्ध असून ही संख्या निकषांपेक्षा जास्त आहे. तरीही भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुढील दहा वर्षांसाठी आयसीयू सुविधांचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम शासनाकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या रोडमॅपनुसार नवीन आयसीयू सुविधा उभारणे, विद्यमान क्षमतेत वाढ करणे, तसेच गंभीर रुग्णांसाठी उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणे यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.