Pune : हडपसरमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी

हडपसर – हडपसर येथे वाय आकाराच्या मगरपट्टा उड्डाणपुलावर पहाटे ४:३० साडेचारच्या सुमारास दुभाजकावर कंटेनर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सोलापूर व सासवड महामार्गावर वाहनांची प्रचंड मोठी रांग लागली होती.
सोलापूर महामार्गावर मांजरी फाटा आणि सासवड मार्गावरील गोंधळेनगरपर्यंत वाहनांची रांग गेली होती. पहाटेच्या सुमारास कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस हजर नसल्याने वाहनांची रांग वाढत गेली, यातून सुमारे पाच तास वाहतूक कोंडी झाली. सोलापूर महामार्गावरून नगर महामार्गाकडे निघालेला कंटेनर मगरपट्टा उड्डाणपुलावरील चौकात वळण घेत होता.
पूलावर अंधार असल्यामुळे वाहनचालकाला दुभाजक दिसला नाही, त्यामुळे कंटेनर दुभाजकावर चढला. त्यामुळे शहर व मगरपट्ट्याकडे जाणारी वाहने अडकून पडली. त्यानंतर सुमारे तीन कि.मी.पर्यंत रांग वाढत गेली. दरम्यान, साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन क्रेन लावून वाहतूक पोलिसांनी कंटेनर काहीसा बाजूला केला, त्यामुळे वाहतूक कोंडी फुटली. एकाच वेळी सर्वच बाजुने वाहने पुढे येवू लागल्याने पुन्हा वाहतूक कोंडी झाली.
या पुलासह पुलाखालील रस्त्यावरही मोठी कोंडी झाली. सकाळची वेळ असल्याने कर्मचारी, कामगार, विद्यार्थी आदींची लगबग असल्याने पुलाच्या परिसरातील रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. मांजरी फाटा ते मगरपट्टा हे अवघ्या दोन कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दिड तासपेक्षा अधिक वेळ लागला. पुलाखालील कोंडीमुळे पादचाऱ्यांनाही मोठी अडचण निर्माण झाली होती.
‘वाय आकाराच्या उड्डाण पुलावर पुलावर कंटेनर अडकला, त्यामुळे मोठी कोंडी झाली. हा कंटेनर दोन क्रेन लावून बाजुला करण्यात आला. यासाठी कर्मचाऱ्यांनी मोठे प्रयत्न केले. या कारणातू महामार्गावर कोंडी वाढली होती. ठिकठिकाणी जावून वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविली.’ – राजेंद्र करणकोट, वाहतूक पोलीस निरीक्षक, हडपसर





