पुणे- हुबळी, कोल्हापूर “वंदे भारत’चे लोकार्पण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन वंदे भारत ट्रेन्सची भेट दिली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ही अतिशय उत्तम आणि अत्याधुनिक सुविधा असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन आहे.
महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा सुखकर प्रवासासाठी फायदा होणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस भारताची शान आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुणे-हुबळी आणि पुणे कोल्हापूर आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आॅनलाइन झाले.
पुणे स्थानकावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
याप्रसंगी नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, दि. १७ सप्टेंबरला केंद्र सरकारला १०० दिवस पूर्ण होत आहेत. आतापर्यंत ३ लाख कोटींची कामे सुरू झाली आहेत. विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकाचे स्वरूप या सरकारच्या काळात पाहायला मिळाले.
आपल्या राज्यात आत्तापर्यंत १३ वंदेभारत सुरू झाल्या आहेत. पुणे-लोणावळा नवीन तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचे काम लवकर सुरू होईल, याला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. यामुळे पुणे मुंबई प्रवास वेगवान होणार आहे.
नव्या प्रकल्पांची माहिती
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प वेगाने केला जाणार आहे. पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याकरिता उरुळी येथे भव्य असे टर्मिनल उभारले जाईल.
कर्जत-कामशेत आणि कर्जत-तळेगाव नव्या रेल्वे मार्गाचे काम करण्याचे प्रस्तावित आहे, ही कामे पूर्ण झाल्यावर पुणे-मुंबई प्रवासाचा वेग अवघ्या दोन तासांवर येणार आहे, असे मोहोळ यांनी या वेळी सांगितले.
विशेष मुलांनी केली वंदे भारत एक्स्प्रेसची सफर
अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र वानवडी येथील २५ मुलांनी वंदे भारत रेल्वेची सफर केली. यावेळी मुलांनी या अत्याधुनिक वातानुकूलित रेल्वेची पहिली सफरचा आनंद घेतला आणि खुप चांगली सफर झाल्याचे सांगितले.





