पुणे – महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. चव्हाणनगर धनकवडी येथील दोन सोसायट्यांसमोरील रस्ता ड्रेनेज लाइनसाठी खोदण्यात आला. त्यानंतर तब्बल महिनाभरापासून हा रस्ता तसाच ठेवण्यात आला आहे.
चव्हाणनगर, धनकवडी येथील विणकर सभाग़ृहाजवळ सिद्धकला सोसायटी आणि निर्मल पार्क सोसायटी आहे. येथे जवळपास 40 घरे असून, येथे यापूर्वी सिमेंट रस्ता होता. मात्र, महिनाभरापूर्वी रस्ता खोदण्यात आला. तेथे मोठ्या व्यासाची पाण्याची लाइन टाकण्यात आली. मात्र, रस्ता तसाच खोदलेलाच ठेवण्यात आला. त्यावेळी रस्ता आठ दिवस बंद होता. त्यामुळे नागरिकांना वाहने इतरत्र ठेवावी लागली. तर खोदाईमुळे बाहेरही पडता येत नव्हते. त्यानंतर नागरिकांनी रस्ता पूर्ववत करून देण्याची मागणी केली. यावर पालिकेने “आता खोदाई सुरू झाली असून ड्रेनेज तसेच गॅस वाहिनी टाकली जाणार आहे. त्यानंतर रस्ता दुरूस्त केला जाईल,’ असे सांगितले. मात्र, महिना झाला तरी येथे कोणतेच काम न करता खोदलेला रस्ता तसाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची कोंडी झाली आहे. या प्रकाराची तक्रार क्षेत्रीय कार्यालय तसेच पथ विभागाकडे केल्यानंतरही केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असून आम्ही घरी जायचे तरी कसे..? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महिनाभरापासून आमच्या सोसायटीसमोरचा रस्ता खोदण्यात आला आहे. आम्ही तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. आधी आठ दिवसांचे काम असेल, असे सांगण्यात आले. मातीच्या ढिगांमुळे वाहनेही घेऊन जाता येणार नाही. आम्ही नियमित कर भरतो, त्याची अशी शिक्षा महापालिका आम्हाला देणार का?
– कुमार खराडे, स्थानिक नागरिक