Pune : महापालिकेच्या जागांवर होर्डींग्ज उभारण्याचा घाट

पुणे : पुणे महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा आणि इमारतींवर आता जाहिरात फलक (होर्डिंग्ज) लावण्यास परवानगी मिळणार आहे. यासाठी पाचशेहून अधिक जागा निश्चित करण्यात आल्या असून, यातून महापालिकेला वार्षिक सव्वादोनशे ते अडीचशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. यासंबंधीचा प्रस्ताव आकाशचिन्ह विभागाकडून तयार करण्याचे काम सुरू आहे.
सात वर्षांपूर्वीच अशाच प्रकारे प्रशासनाकडून अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने हा प्रस्ताव गुंडाळण्यात आला. मात्र, आता पुन्हा एका ठराविक ठेकेदारासाठीच हा प्रस्ताव आणला जात असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या २ हजार ६०० हून अधिक अधिकृत होर्डिंग्ज आहेत, तर नियमबाह्य पद्धतीने उभारलेल्या होर्डिंग्जची संख्या सुमारे १ हजार ७०० च्या जवळपास आहे. अधिकृत होर्डिंग्जमधून महापालिकेला वार्षिक ३० ते ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, उत्पन्न वाढीचा नवा पर्याय निर्माण करण्यासाठी महापालिकेने आता शहरातील मोक्याच्या जागा आणि इमारतींवर होर्डिंग्जला परवानगी देऊन त्यातून उत्पन्न मिळवण्याची चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार, जवळपास सव्वापाचशे जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या आकाशचिन्ह धोरणानुसार त्या ठिकाणी होर्डिंग्ज उभारण्यास परवानगी दिली जाणार असून, जागेचे भाडे आणि आकाशचिन्ह परवाना शुल्क या माध्यमातून पालिकेला तब्बल सव्वादोनशे ते तीनशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या जागांवर होर्डिंग्जला परवानगी देण्याचा प्रस्ताव आला होता, मात्र त्यावर कार्यवाही होऊ शकली नव्हती. आता पुन्हा प्रशासनाकडून त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत आकाशचिन्ह परवाना विभागाकडून यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो स्थायी समिती आणि मुख्यसभेच्या मंजुरीनंतरच त्यावर कार्यवाही होणार आहे.




