Pune : होर्डिंग को स ळ ले; पीएमआरडीए हद्दीत अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर

पुणे : एखादी दुर्घटना घडल्यानंतर सर्व शासकीय यंत्रणा जागी होऊन नियमावर बोट ठेऊन काम करते. मात्र, त्या घटनेनंतर काही दिवसांनी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, अशी स्थिती होते. असाच प्रकार आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत दिसून येत आहे. अनधिकृ होर्डिंगवर कठोर कारवाई करण्याच्या वल्गना करणाऱ्या प्राधिकरणाला आपल्याच आदेशाचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुळशी येथील भुकुम मध्ये जोरदार वाऱ्यामुळे दोन मोठे होर्डिंग कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. त्यामुळे प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे, एखाद्या व्यक्तीचा अशा दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतरच पीएमआरडीएला जाग येणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहे.
मुंबई येथील घाटकोपर येथे मागील वर्षी मे महिन्यातच होर्डिंग कोसळून 17 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. एप्रिल 2023 मध्ये कात्रज -देहू बाह्यवळण मार्गावरील किवळे येथे होर्डींग कोसळून पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनेंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये होर्डिंगचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने 10 तालुक्यांमध्ये 1 हजार 440 होर्डिंग आढळून आले. त्यामध्ये फक्त 27 होर्डिंग अधिकृत होते. विशेष म्हणजे यातील 87 होर्डिंग धोकादायक असल्याचे आढळून आले.
जिल्ह्यातील सुमारे दिड हजार अनधिकृत होर्डिंग नोटीसा बजावण्यास सुरुवात झाली तर सुमारे 170 अनधिकृत होर्डिंग मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर, मोजकेच होर्डिंग कारवाई करीत ते पाडण्यात आले. मात्र, ही कारवाई काही दिवसांतच मागे पडली. पुन्हा अनधिकृत होर्डिंग उभे राहू लागले. त्यामुळे अशा अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्या व्यावसायिकांवर प्राधिकरणाचा कोणताच वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.
परवानगी नाहीच…
सद्या ग्रामीण भागात मुख्य रस्त्याकडेला होर्डिंग उभारले जातात. जागा मालक होर्डिंग भाडे तत्त्वावर देतो. अशा होर्डिंगसाठी बहुतेक जागामालक प्रशासनाची परवानगी घेत नाहीत. तसेच, अनधिकृतपणे होर्डिंग उभारतात. या होर्डिंगचा साचा उभारताना वाऱ्याचा वेग, साच्याची मजबुती, वजन पेलण्याची क्षमता आदी बाबींचा कोणताच विचार केला जात नाही. होर्डिंग उभारून त्यामधून पैसे कमाविण्याचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता यावर होर्डिंग मालकाकडून कोणताच विचार होताना दिसत नाही.
होर्डिंग कोसळण्याचा घटनेमुळे निष्पाप नागरिकांना बळी जातो. पावसामध्ये होर्डिंगजवळ त्याखाली थांबणाऱ्यांची संख्या अधिक आहे. होर्डींग जवळून पायी चालत असतो, तर कोणी वाहनातून प्रवास करत असतो. अन अशातच होर्डींग कोसळून नागरिकांचा जीव गेला आहे. काही होर्डींगचा आकार पाहता ते अवाढव्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता मोठया होर्डींग जवळून प्रवास करताना नागरिकांच्या मनात सुध्दा भिती निर्माण होते.





