Pune : शहरात तापमानाचा उच्चांक

पुणे : शहरातील वाढत्या तापमानामुळे सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेचा पारा ४२ अंशाच्या पुढे नोंदविला. लोहगाव येथे सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून, हंगामातील पुण्यातील हे उच्चांकी तापमान आहे.
मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. ग़ेल्या २४ तासांत उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याने पुणेकर उकाड्याने घामाघूम झाले आहेत. दुपारी घराबाहेर पडावे, तर उन्हाच्या चटक्याने अंगाची लाहीलाही होत आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ४२ ते ४३ पर्यंत जाणारे कमाल तापमान महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात गेल्याने यंदाचा उन्हाळा पुणेकरांना असह्य करणार असे चित्र आहे.
बुधवारी (दि. ९) दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर दुपारी वाहनांची वर्दळ कमी होती, तर उन्हाने घशाला पडलेली कोरड भागविण्यासाठी थंड पेयांच्या दुकानांवर नागरिकांनी गर्दी केली. लोहगाव पाठोपाठ कोरेगाव पार्क, तळेगाव ढमढेरे, शिवाजीनगर, शिरूर, चिंचवड, वडगावशेरी आणि हडपसर परिसरातील कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे नोंदविले. मात्र, उन्हाचा वाढता चटका पुढील दोन दिवस कायम राहणार असून, त्यानंतर दिवसभर आकाश निरभ्र आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
शहर आणि जिल्ह्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
कोरेगाव पार्क आणि तळेगाव ढमढेरे ४०.८, शिवाजीनगर ४०.७, शिरूर ४०.५, चिंचवड ४०.३, वडगावशेरी ४०.१, हडपसर ४०, मगरपट्टा ३९.६, एनडीए ३८.८, इंदापूर ३८.६, बालेवाडी ३८.१, हवेली ३७.१, लवासा ३६.७,




