Pune : बासमतीसह विविध प्रकारच्या तांदळाला मोठी मागणी

पुणे : देशात बासमतीचे आकर्षण तर आहेच. लग्नसराई, येणाऱ्या सणामुळे सर्वच प्रकारच्या तांदळाला चांगली मागणी आहे. आता देशाबाहेरही तांदळाला मागणी वाढत आहे. सर्वाधिक मागणी बासमती तांदळाला असली तरी, बिगर बासमतीला देखील मागणी वाढल्याने मागील दोन महिन्यांत तांदळाचे भाव तेजीत आहेत. देशातील तांदुळ उत्पादन करणाऱ्या राज्यातून बासमतीसह विविध प्रकारचे तांदूळ भुसार बाजारात येत आहेत.
मार्केट यार्डातील भुसार विभागात छत्तीसगड, नागपूर,रायपूर , गुजरात या भागातून कोलम, वाडा कोलम, चिन्नोर, आंबेमोहर आदी तांदळाची आवक सुरु आहे. तसेच कर्नाटक येथील रायचूर व अन्य जिल्हयातून सोना मसुरी तांदूळ बाजारात येत आहे. बेळगाव जवळील इंद्रायणी, पुणे परिसरातील इंद्रायणी व गावरान आंबेमोहर बाजारात येत आहे. मध्यप्रदेश येथून ११२१, १५०९, बासमती सेलाचीही आवक सुरू आहे. हरियाणा,पंजाब व उत्तर प्रदेशमधून ११२१, १५०९, १४०१ पुसा व सरबती तांदूळ आला आहे. नवीन पारंपारिक बासमतीचीही आवक सुरू असल्याचे तांदळाचे व्यापारी अभय संचेती यांनी सांगितले.
दरवर्षी इराणमध्ये साधारणतः १४ लाख टन, सौदी अरेबिया ९ ते १० लाख टन, युरोप ४ ते ५ लाख टन आणि अमेरिकेला दोन ते तीन लाख टन तांदूळ निर्यात होतो. तसेच युरोप मधूनही तांदळाला मोठी मागणी असते. मागील काही वर्षांपासून लचकारी कोलम, सुगंधी कालीमूछ, इंद्रायणी आदी तांदळाची निर्यात देखील वाढली आहे. अमेरिका, युरोप, आफ्रिका आदी ठिकाणांहून आंबेमोहोर सह बिगर बासमती तांदळाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली.
तांदळाला वर्षभर मागणी असते. यामध्ये बासमतीसह बिगर बासमतीचा समावेश आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत तांदळाचे भाव तेजीत आहेत.
– अभय संचेती, तांदळाचे व्यापारी, मार्केट यार्ड
पारंपारिक बासमतीपेक्षा ११२१ जातीच्या बासमती लागवडीला पसंती
पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश येथील शेतकरी पारंपरिक बासमती तांदळाच्या ऐवजी ११२१ जातीच्या बासमती तांदळाच्या लागवडीकडे वळला आहे. पिकाला लागणारा कमी कालावधी आणि उत्पन्न अधिक मिळत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पारंपरिक बासमती तांदळाची लागवड कमी होत चालली आहे.
घाऊक बाजारातील तांदळाचे प्रतिकिलोचे दर
प्रकार — दर
– बासमती पारंपरिक — १०० ते १२०
– बासमती ११२१ — १०२ ते ११५
– बासमती १७१८ — ८० ते ८५
– बासमती १५०९ स्टीम — ८० ते ८५
– आंबेमोहर — ८५ ते ९२
– कोलम — ६० ते ७५
– इंद्रायणी — ४५ ते ५५





