पुणे : बलात्कार किंवा लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारने त्यांचे भावनिक विश्व उद्ध्वस्त होते. त्यांना या मानसिक अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन करण्याबरोबरच पीडितांना पोलिस संरक्षण देणे, पीडितांना स्वतःहून अर्ज द्यायचा असेल, तर अशांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीत ‘साहाय्य कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या साहाय्य कक्षचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पीडितांना कायदेशीर आणि भावनिक मदत देऊन त्यांना पुन्हा समाजात प्रतिष्ठेने उभे राहण्यासाठी प्रोत्साहित आणि सशक्त करण्याची महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनाली पाटील यांनी सांगितले.