Pune : अपघातास जबाबदार असलेली अवजड वाहने होणार जप्त

पुणे : अवजड वाहनांमुळे शहरात झालेल्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत गंभीर स्वरुपाच्या अपघातास जबाबदार असलेल्या अवजड वाहनांची माहिती संकलित करण्यात येणार असून अशी वाहने जप्त करण्यात येणार आहेत. संबंधित वाहनचालकांचा परवानाही रद्द केला जाणार आहे, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (दि.११) दिला.
मार्केट यार्डातील गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी दीपाली सोनी या माहिलेचा मृत्यू झाला. अपघातात दीपालीचे सासरे गंभीर जखमी झाले. या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवजड वाहने तसेच चालकांवर कडक कारवाईचा इशारा दिला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी असताना अनेक वाहनचालक नियमभंग करीत आहेत.
यातून वाहतूक कोंडी तसेच गंभीर अपघात होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गेल्या वर्षी शहरात ३३४ प्राणांतिक अपघात (फेटल ॲक्सिडेंट) झाले. या अपघातात ३४५ जणांचा मृत्यू झाला. गेल्या पाच महिन्यांत शहरातील वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात १३३ जणांचा मृत्यू झाले आहेत. पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन वाहनचालकांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. परवाना रद्द करणे, वाहन जप्त करणे आणि न्यायालयीन कारवाईचा समावेश असणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.
अवजड वाहनांमुळे गंभीर स्वरुपाचे अपघात वाढले आहेत. अवजड वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) ही कारवाई केली जाणार आहे.
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे
शहरातील प्राणांतिक अपघात
वर्ष अपघातांची संख्या मृत्यू
२०२४ ३३४ ३४५
२०२५ १२९ १३३
(मे २०२५ अखेरीपर्यंतची आकडेवारी )





